मुंबई: शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी हिंदी भाषेबाबत मोठे विधान केले. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, त्यांचा पक्ष महाराष्ट्रात हिंदी सक्तीची होऊ देणार नाही. आम्ही महाराष्ट्रावर हिंदी भाषा लादू देणार नाही. दरम्यान, फडणवीस सरकारने पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व शाळांमध्ये हिंदी ही तिसरी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय घेतला आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
शिवसेनेची कामगार शाखा असलेल्या भारतीय कामगार सेनेच्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'आमच्या पक्षाला हिंदी भाषेवर कोणताही आक्षेप नाही, पण ती सक्ती का केली जात आहे.' महाराष्ट्रातील मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी ही तिसरी भाषा सक्तीची करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयावर विरोधकांकडून होत असलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचे हे महत्त्वपूर्ण वक्तव्य समोर आले आहे.
हेही वाचा - अटीशर्थी घालण्याचा अधिकार राजना आहे का?; राज-उद्धव युतीवर संदीप देशपांडेंचे भाष्य
मी भाजपशी संबंध तोडले आहेत, हिंदुत्वाशी नाही - उद्धव ठाकरे
यापूर्वी, उद्धव यांनी नाशिकमधील एका कार्यक्रमात म्हटले होते की, त्यांनी हिंदुत्वाची विचारसरणी सोडलेली नाही, परंतु त्यांना माजी मित्रपक्ष भाजपच्या हिंदुत्वाची 'कुजलेली' आवृत्ती त्यांना मान्य नाही. मी भाजपशी संबंध तोडले आहेत, हिंदुत्वाशी नाही. मी मेलो तरी हिंदू धर्म सोडणार नाही. मशाल हे पक्षाचे निवडणूक चिन्ह असू शकते, परंतु भगवा रंग ही त्याची ओळख आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा - राज-उद्धव युतीवर उद्धव ठाकरेंना घातल्या अटी; अटी मान्य असतील तर युती होणार?
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे युती -
दरम्यान, चित्रपट अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची एका पॉडकास्टमध्ये मुलाखत घेतली. महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंना अनेक तीक्ष्ण प्रश्न विचारले आहेत. या मुलाखतीत मांजरेकर यांनी मनसे प्रमुखांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे राजकीय स्वरूपात एकत्र येण्याबद्दल प्रश्न विचारला आहे. यावर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र आणि मराठीच्या मुद्द्यावर ते एकत्र येण्यास तयार आहे. पण यासाठी त्यांचीही तीच इच्छा असायला हवी, असं म्हटलं होतं. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीबद्दल चर्चांना उधान आलं आहे.