Tue. Sep 28th, 2021

मंत्री विजय वडेट्टीवार फसले!

राज्यात टाळेबंदीसारखे निर्बंध उठवण्याचा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. अनलॉक बाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असं मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आल्याने याबाबतची घोषणा करणारे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची पंचाईत झाली आहे. या सर्व प्रकरणामुळे राज्य सरकारमधील निर्णय प्रक्रियेत सुरू असलेल्या गोंधळ आणि असमन्वय चव्हाट्यावर आला आहे.

मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन राज्यात पाच टप्प्यांत निर्बंध उठवले जाणार असल्याची घोषणा केली. कोविड पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजनची सुविधा असलेल्या खाटांची उपलब्धता या आधारावर जिल्ह्यांची वर्गवारी करण्यात आली आहे आणि हे जिल्हे पाच टप्प्यांत लॉकडाऊनमुक्त होतील, असे वडेट्टीवार यांनी नमूद केले होते. त्यांनी निर्बंध कसे शिथील होणार याचा संपूर्ण तपशीलही दिला होता. मात्र, या पत्रकार परिषदेनंतर काही वेळातच मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण आलं आणि वडेट्टीवार यांची गोची झाली. राज्यात निर्बंध उठवण्यात आलेले नाहीत. टप्पेनिहाय निर्बंध शिथील करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असे सरकारने स्पष्ट केले.

‘महाराष्ट्र अनलॉकचा येथे प्रश्नच उद्भवत नाही. आपत्ती व्यवस्थापन विभागाने जिल्हानिहाय पाच स्तरीय अनलॉक करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे आणि त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्वत: मान्यता दिलेली आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेणार आहेत. येत्या एक-दोन दिवसांत हा आदेश जारी होईल’, असे वडेट्टीवार म्हणाले. उद्यापासून १८ जिल्हे अनलॉक होणार का, असे विचारले असता वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देणे टाळले.

काय आहे मुख्यमंत्री कार्यालयाचं स्पष्टीकरण?

‘राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथील करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सूचना शासननिर्णयाद्वारे अधिसूचित करण्यात येतील. अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथील करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते शासननिर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल’, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *