Fri. Oct 7th, 2022

सत्तासंघर्षानंतर पहिल्यांदाच महाविकास आघाडीची बैठक

राज्यात सत्तासंघर्षांनंतर महाविकास आघाडीची पहिल्यांदाच बैठक होणार आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मुंबईत येत्या २९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीला पवार यांच्यासह माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे , काँग्रेसचे विधीमंडळातील नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीचे महत्वाचे नेते हजेरी लावणार आहेत. त्यामुळे या बैठकीत काय घडते, याकडे राज्याचे लक्ष असणार आहे.

महाविकास आघाडीची महत्वाची बैठक येत्या २९ सप्टेंबर रोजी होणार आहे. या बैठकीला शरद पवार माजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे नेते उपस्थित राहणार आहेत. याशिवाय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षातील महत्वाचे नेतेही या बैठकीला हजेरी लावणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील राजकीय परिस्थिती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यावर चर्चा करण्यासाठी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

शिवसेनेतील बंडानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. तेव्हापासून महाविकास आघाडीची बैठक शरद पवारांच्या उपस्थितीत झाली नव्हती. या अगोदर मागील अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विधीमंडळात बैठक झाली होती. मात्र, आता पवार, ठाकरे आणि काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. त्यामुळे त्याला विशेष महत्व असणार आहे.

दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. राज्यातील जनावरांमध्ये आलेला लंपी आजार, थांबलेला विकासनिधी, विकास कामांना देण्यात आलेली स्थगिती याबाबत चर्चा करण्यासाठी ही भेट घेणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.