मलिक, देशमुखांची याचिका न्यायालयाने फेटाळली

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे दहाव्या जागेसाठी भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना होणार आहे. दरम्यान, अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेत अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी मतदानासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी मलिक, देशमुखांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने मलिक आणि देशमुखांची याचिका नाकारली आहे. त्यामुळे विधानपरिषदेतही मविआला मोठा धक्का बसला आहे.
आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडीच्या कोठडीत आहेत. तर नवाब मलिकांना ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. याआधी राज्यसभा निवडणुकीत उच्च न्यायालयाने मलिक आणि देशमुखांचा मतदानाचा अधिकार नाकारला होता. त्यानंतर आता विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी मलिक आणि देशमुखांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, यावेळीही सर्वोच्च न्यायालयाने मलिक, देशमुखांचा मतदानाचा अधिकार नाकारला आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे आणि नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे संख्याबळ ५३ आहे. तर, मलिक आणि देशमुख यांचा मतदानाचा अधिकार नाकारल्यामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ ५१ आहे. विधानपरिषद निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला जिंकण्यासाठी २७ मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे आता मलिक, देशमुखांचा मतदानाचा अधिकार डावल्यामुळे निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.