‘देश संकट में है’ म्हणत विरोधकांची एकजूट!

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आज कोलकाता येथे भाजपाविरोधात सर्व राजकीय पक्षांना एकत्र आणण्यासाठी भारतीय एकता सभा आयोजित केली आहे. या सभेत 20 विविध पक्षाच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे.

कोलकात्ता शहरात ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षाची संयुक्त रॅली होणार आहे. ब्रिगेड परेड मैदानावर होत असलेली ही रॅली पश्चिम बंगालमधली आत्तापर्यंतची सर्वात मोठी रॅली असल्याचं म्हटलं जात आहे.

या सभेमध्ये भाजपचे बंडखोर नेते यशवंत सिन्हा, अरुण शौरी हेदेखील सामील झाले आहेत. यशवंत सिन्हा यांनी मोदींवर टीका करताना ‘सब का साथ, सब का विकास’ ऐवजी मोदी ‘सब का विनाश’ करत असल्याच घणाघात त्यांनी केला आहे. तर नॅशनल कॉन्फरन्सचे फारूख अब्दुल्ला यांनीही मोदींवर टीका केलीय. देशामध्ये अघोषित आणीबाणी सुरू असून मोदींना सत्तेवरून घालवणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं. तिहेरी तलाखसाठी कायदा आणू इच्छिणारे मोदी महिला आरक्षणावर का गप्प आहेत असा सवालही त्यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हेदेखील या कार्य़क्रमाला हजर होते. मात्र काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या सभेला येणं टाळलं. त्यांच्याऐवजी मल्लिकार्जुन खरगे हे उपस्थित होते. तसंच काँग्रेसचे अभिषेक मनू सिंघवीही उपस्थित होते. त्यांनीही आपल्या भाषणात मोदी सरकार सूडाच्या भावनेने राजकारण करत असल्याचं त्यांनी म्हटलं.

Exit mobile version