पत्नीवरील रागातून मेहुणीच्या 1 महिन्याच्या चिमुकल्याची निर्घृण हत्या

पत्नीशी भांडणाचा वचपा काढण्यासाठी जावयाने मेहुणीच्या एक महिन्याच्या चिमुकल्याची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना नागपूर येथील बाखरी गावात घडली.
काय घडलं नेमकं?
गणेश बोरकर यांचं लग्न बाखरी खुशाल वारकर यांच्या मोठ्या मुलीशी झालं होतं.
गणेश नेहमीच त्याच्या बायकोला मारहाण करायचा.
त्यामुळे चार दिवसांपूर्वीच मुलगी वडिलांकडे राहायला आली होती.
बायको आपल्यासोबत नांदायला येत नाही, या रागातून गेल्या दोन-तीन दिवसांपासून गणेश सासरी जाऊन सासरच्या मंडळीसोबत वाद घालत होता.
काल दुपारीसुद्धा गणेश सासरी गेला.
त्यावेळी त्याने बायको आणि सासरच्या मंडळींसोबत वाद घालायला सुरवात केली.
त्यावेळी संतापलेल्या गणेश बोरकरने रागाच्या भरात त्या ठिकाणी झोपलेल्या मोहुणीच्या अबोल चिमुकल्याच्या पोटात धारधार शस्त्र खुपसून त्याला गंभीर जखमी केले.
जखमी चिमुकल्याचे वय केवळ 1 महिना 4 दिवस होतं.
गंभीर जखमी अवस्थेत लहान बाळाला नागपूरच्या रुग्णालयात आणण्यात आलं.
मात्र त्याचा मृत्यू झाला.
आज त्या बाळाचं बारसं होतं. मात्र नामकरणापूर्वीच चिमुकल्याने अखेरचा श्वास घेतला.
नराधम गणेशने केलेल्या गुन्ह्याची माहिती मिळताच पारशिवनी पोलिसांनी गुन्हा नोंद करून आरोपीचा शोध सुरु केला. आरोपी कुहीच्या बाजारात लपून असल्याची माहिती समजताच पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून आरोपीला अटक केली.