Mon. Feb 24th, 2020

पाकिस्तानातून ‘तो’ पुन्हा मुंबईत आलाच…

 “बॉलिवूडमधला सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार मला बनायचं आहे”, असं मुलाखतीमध्ये ठणकावून सांगणाऱ्या नवाजुद्दिन सिद्दकीचा गेल्या शुक्रवारी एक सिनेमा प्रदर्शित झालाय. या सिनेमाचं नाव आहे ‘मंटो’, आणि या सिनेमात प्रमुख भूमिका करण्यासाठी नवाजने मानधन घेतलंय चक्क 1 रुपया… गीतकार-लेखक जावेद अख्तर यांनी या सिनेमात अभिनय केलाय आणि त्यांनी या सिनेमासाठी 1 रुपयाही घेतला नाहीय. जी गोष्ट जावेद साहेबांची तीच अभिनेता ऋषी कपूरची… त्यानेही या सिनेमात विनामोबदला अभिनय केलाय. बॉलिवूडच्या या एकाहून एक तालेवार मंडळींनी मानधन न घेता काम करण्यामागचं कारण एकच आहे… ते म्हणजे ‘मंटो’… ‘मंटो’ या व्यक्तीची ताकदच अशी आहे, जी इतक्या वर्षांनीही नंदिता दाससारख्या सशक्त अभिनेत्रीला आपल्या कारकीर्दीची 6 वर्षं या त्याच्यावरच्या सिनेमाचं स्क्रिप्ट लिहिण्यात घालवावी लागतात, तो मंटो…

भारत जेव्हा एका मोठ्या स्थित्यंतरातून जात होता, त्या प्रवासाच्या अनेक साक्षीदारांपैकी एक होता ‘सआदत हसन मंटो’. 11 मे 1912 ला लुधियान्याच्या समराला गावी जन्मलेला. काश्मिरी मुस्लीम बॅरिस्टरांच्या घराण्यातला… त्याला तर बॅरिस्टर होणं जमलं नाही, पण आरोपी म्हणून कोर्टात मात्र वारंवार जावं लागलं… त्याचा अपराध होताही गंभीर… तो आपल्या लघुकथांमधून ‘सत्य’ मांडायचा… ज्या 20 व्या शतकाने दोन महायुद्धं पचवली, अनेक क्रांती अनुभवल्या… त्या शतकातले भारत-पाकिस्तान मंटोच्या लघुकथांनी हादरून गेले.  

शायरीमध्ये रमलेल्या उर्दू साहित्यविश्वात उलथापालथ करणारा मंटो शाळेच्या परीक्षेत मात्र उर्दू विषयात दोनदा नापास झाला होता. त्याचं शिक्षण सुरू होतं ते अमृतसरच्याच मुस्लिम हायस्कूलमध्ये. येथेच त्याच्या छोट्या विश्वाला पहिली धडक बसली ती ‘जालियानवाला बाग हत्याकांडा’ने…  अवघ्या 7 वर्षांच्या मंटोवर ही घटना पहिला घाव देऊन गेली. त्याचेच पडसाद मंटोच्या ‘तमाशा’ नामक उर्दू लघुकथेत वाचायला मिळतात… जालियवाला बाग हत्याकांडाच्या दिवसाला एका 7 वर्षीय मुलाच्या नजरेतून मंटोने चितारलंय.

मंटोला वाढत्या वयात भवतालाचं भान यायला लागलं, तेव्हा देशात स्वातंत्र्याचे आणि जगात कम्युनिझमचे वारे वाहू लागले होते. या गोष्टींनी मंटोला अक्षरशः घुसळून काढायला सुरुवात केली. इतकी की, वडिलांच्या मृत्यूनंतर मंटोने भगतसिंगची मूर्ती वडिलांच्याच फोटो शेजारी ठेवली. ‘द लास्ट डेज़ ऑफ़ अ कंडेम्ड’ या साम्यवादाचा प्रभाव असणाऱ्या पुस्तकाचं ‘सरगुजश्त-ए- असिर’ नावाने त्याने उर्दूत भाषांतर केलं. रशियन कथाही त्याने ‘रुसी अफसाने’ नावाने उर्दू भाषांतरीत करून पुस्तक रूपाने छापल्या. काही मासिकांत ‘इन्कलाब पसंद’ या नावाने तो लघुकथा लिहीत होता. पण कॉलेजचं शिक्षण मात्र ‘तळ्यात मळ्यात’ सुरू होतं.

 422395-SaadatHasanManto-1345052891-747-640x480.JPG

लाहोरमधले दिवस…

वैतागलेला मंटो घर सोडून लाहोरमध्ये राहू लागला. तोपर्यंत अर्थातच फाळणी झाली नव्हती. लाहोरमध्ये मंटो मासिकांत संपादकीय काम करू लागला. 1941 साली दिल्लीच्या ‘ऑल इंडिया रेडिओ’मध्ये मंटोने लेखक म्हणून काम करू लागला. हे दिवस त्याच्या कारकीर्दीतले सर्वांत महत्त्वाचे दिवस ठरले. ‘जनाज़े’, ‘आओ…’, ‘तीन औरते’, ‘धुवाँ‘, ‘मंटो के ड्रामे’ यांसारख्या लघुकथा त्याने लिहील्या. पण मंटो मुळातच अस्वस्थ वृत्तीचा असल्यामुळे 17 महिन्यांतच त्याने ही नोकरी सोडली… मंटो त्याच्या लाडक्या शहरात म्हणजे मुंबईत आला.

 

manto-whitestar-670x-350.jpg

 

लाहोर ते मुंबई… रेडिओ ते सिनेमा!

मुंबईमध्ये मंटोने ‘अपनी नगरीया’, ‘मिर्झा गालिब’ यांसारख्या सिनेमांच्या कथा, पटकथा लिहिल्या. ‘आठ दिन’ या सिनेमात तर स्वतः मंटोने छोटीशी भूमिकाही साकारली. मुंबई, बॉलिवूड मंटोला भावलं. या ठिकाणचे नातेसंबंध, नैतिकता आणि मूल्यं, ग्लॅमर आणि त्यामागचा खोटेपणा यांवर मंटोची लेखणी कोणतीही भीडभाड न बाळगता लिहिती झाली… पन्नासच्या दशकातील बॉलिवूडमधली अनेक कलाकारांची ‘लफडी’ त्याने बिनबोभाट लिहिली. अशोक कुमारशी त्याची चांगलीच गट्टी जमली. बॉलिवूडमध्ये त्याला यशाची चव चाखायला मिळत होती. पैसाही मुबलक मिळत होता. तो मुंबईच्या प्रेमात होता, देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर होता आणि मंटोचं भविष्य वादळाच्या वेशीवर…

 saadat-hasan-manto-the-man-who-wrote-nothing-but-the-naked-truth-1400x653-1495112603_1100x513.jpg

 

फाळणी, पाकिस्तान आणि मंटो…

भारत स्वतंत्र झाला. मात्र त्याचबरोबर भारताला फाळणीची जखम मिळाली. पाकिस्तान निर्माण झाला. मित्रांनी मुंबईला थांबायचा आग्रह जरी केला, तरी हिंदू-मुस्लिम दंगलींनी मंटो अस्वस्थ झाला होता. लाहोरला स्थायिक होण्यासाठी तो पाकिस्तानात निघून गेला आणि त्याच्या आयुष्यातला झंझावाती कालखंड सुरू झाला.

manto_writing.jpg

बीभत्स, अश्लील, व्यसनी की असामान्य… ‘मंटो’ नेमका कसा?

मंटो नवनिर्मित पाकिस्तानात स्थायिक झाला. पण हा देश आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला अनुकूल नाही हे लवकरच त्याच्या लक्षात आलं. कट्टर मुस्लिम पाकिस्तानात मंटोच्या लिखाणावर मर्यादा आणायचा प्रयत्न सुरू झाला. आधीच लाहोरमधील हिंदू निर्माते मुंबईला स्थलांतरीत झाल्याने तिथे सिनेनिर्मिती होत नव्हती. मंटोला सिनेमाचं काम मिळत नव्हतं. अशातच मंटो दारूच्या पुरता आहारी गेला होता. दारूसाठी दोन पैसे मिळावेत, म्हणून मंटो कोणत्याही मासिकाच्या कार्यालयात जाई. तिथलाच कागद आणि पेन उचलून काहीतरी खरडून देई आणि पैसे घेऊन दारू प्यायला जाई…. पण तो जे काही खरडत होता, ते त्या शतकातल्या महान लघूकथा ठरत होत्या… या काळात त्याचे 14 कथासंग्रह प्रकाशित झाले. 161 लघूकथा यामध्ये समाविष्ट होत्या. या कथांनी खळबळ माजवली होती. या कथांमध्ये फाळणीच्या वेदनांपासून ते वेश्यांच्या जीवनापर्यंत आसपासच्या सगळ्या बीभत्स घटनांचं वर्णन होतं… ‘ठंडा गोश्त’ कथेत प्रेतावर बलात्कार केल्याच्या जाणिवेने आपल्यातील पुरुषत्व संपल्याची भावना असलेला सरदार होता. फाळणीच्या धगीत सामूहिक बलात्कारांनी विषण्ण झालेली ‘सकीना’ त्याच्या ‘खोल दो’ कथेत होती.

वेश्यांचं जग तर मंटोने इतक्या थेटपणे मांडलं, की त्यामध्ये ना वेश्यांप्रती कणव होती, ना किळस… या कथांमध्ये शरीराच्या वासापासून ते सुरकुत्यांमुळे वाटणाऱ्या भीतीपर्यंत सारं काही सहजपणे येत होतं. ‘बू’, ‘फुंदने’, ‘नंगी आवाजे’, ‘काली सलवार’, ‘सियाह हाशिये’ या कथांनी खळबळ माजवली. त्याला बदनाम लेखक करून टाकलं. पण तो मात्र लिहीत राहिला. त्याचा त्याच्या लेखणीवर विश्वास होता… अश्लील लिखाणाबद्दल मंटोवर अनेक खटले गुदरले. तो त्या प्रत्येक खटल्यातून सहीसलामत सुटलाही. कारण त्याचा इरादा साफ होता. तो प्रत्येकाकडे माणूस म्हणूनच पाहात होता… फाळणीत 1000 हिंदू मेले आणि 1000 मुसलमान मेले यापेक्षा 2000 माणसं मेली, हे त्याचं म्हणणं होतं. पतीचा मार खाऊन पुन्हा त्याची सेवा करणाऱ्या अबला नारीपेक्षा एखाद्या व्यापाऱ्याप्रमाणे रोख रक्कम घेऊन शरीरविक्री करणारी वेश्या त्याच्या लेखणीला जास्त भावत होती. ‘माझ्या कथांमध्ये समाजाचं प्रतिबिंब आहे. जर त्या कथा तुम्हाला अश्लील वाटत असतीस, तर त्याचा अर्थ समाजच अश्लील आहे’, असं त्याचं उत्तर होतं. ‘मला घाण दिसली, तर मी त्याबद्दल लिहिणार. मला घाणीबद्दल लिहिणारा लेखक म्हणण्यापेक्षा घाण साफ करण्याचा विचार करा’, असा त्याचा दावा होता.    

manto667.jpg

 

टोबा टेक सिंग

मंटोच्या लेखकीय जीवनाचा कळसाध्याय म्हणजे ‘टोबा टेक सिंग’. वेड्यांच्या इस्पितळात जावं लागलेल्या मंटोला तेथेही कथा दिसली… फाळणी झाल्यावर दोन्ही देशातल्या हिंदू आणि मुस्लीम वेड्यांनाही भारत आणि पाकिस्तानात रवाना करण्यात येतं, अशी ही कथा होती. मात्र वेड्यांचं भावविश्व, त्यात आपण हिंदू आहोत, शीख आहोत, मुस्लीम आहोत की वेडे आहोत असा त्यांचा संभ्रम… त्यातील एका शीख वेड्या जमीनदाराचा आपलं ‘टोबा टेक सिंग’ हे गाव पाकिस्तानात सोडून भारतात जावं लागताना काल्पनिक सरहद्दीवर झालेला मृत्यू… हे वाचताना फाळणी म्हणजेच एक वेडेपणा आहे का, असा प्रश्न निर्माण होतो.

 

nawazuddin-siddiqui-horz.jpg

असा हा मंटो… कोर्टाच्या खटल्यांमधून सुटला खरा, पण सगळ्या गोष्टींनी तो जेरीस आला होता. पाकिस्तान सोडून पुन्हा भारतात येण्यासाठी तो तडफडत होता. दारूचं व्यसन त्याला मरणपंथाला नेत होतं. लेखनाला प्रोत्साहन मिळण्याऐवजी ‘अश्लील लेखक’ म्हणून होणारी बदनामी त्याला छळत होती. त्या काळात त्याने जे लिहिलं, ते आजच्या काळात त्या कालखंडाची बखर म्हणून गौरवलं जातंय. त्याच्या लिखाणातील थेटपणा आज लोकांना पटतोय. 60 वर्षांपूर्वी फेसबुक पोस्टसारखे त्याने लिहलेले किस्से आज लोकांना आपलेसे वाटतायत. पण त्या काळात मात्र त्याच्या आयुष्यात फक्त संघर्ष होता… समाजाशी, स्वतःशी आणि समग्र कालखंडाशी… जेमतेम 42 वर्षं आयुष्य जगलेला मंटो दारिद्र्य, खटले, मानहानी यांनी उद्विग्न होऊन 18 जानेवारी 1955 ला जग सोडून गेला. त्याच्या मृत्यूनंतर जगाला त्याची श्रेष्ठता जाणवली. आज 20 व्या शतकातला सर्वोत्तम लघूकथाकार म्हणून त्याचं नाव घेतलं जातं. एकेकाळी मुंबईत सिनेमासाठी लिखाण करणाऱ्या, छोटीशी भूमिका करणाऱ्या आणि बॉलिवूडचं जग सोडून पाकिस्तानात गेलेल्या मंटोच्या आयुष्यावरच सिनेमा प्रदर्शित झालाय.

 

 

Manto-poster.jpg

 

देश पुन्हा एकदा स्थित्यंतरातून जातोय आणि ‘मंटो’ पुन्हा एकदा अवतरलाय. त्याच्या त्याच लाडक्या मुंबई शहरात, त्याच्या बॉलिवूडच्या जगात… लाहोरमध्ये जेव्हा तो दारिद्र्यात मेला, तेव्हा त्याचा ‘मिर्झा गालिब’ हा सिनेमा मुंबईत गर्दी खेचत होता. भारतात परतून सिनेमे लिहू इच्छिणारा मंटो आज भारतातल्या सिनेमागृहात झळकतोय… भारत-पाकिस्तान सीमारेषा आणखी स्फोटक झाल्या असताना, काश्मीर पेटलेलं असताना, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरून राडा होत असताना, हाच काश्मिरी मुस्लीम लेखक जो हिंदू-मुस्लिम दंग्यांनी व्यथित होऊन मुंबईची चित्रपटसृष्टी सोडून पाकिस्तानात गेला होता… तो परत आलाय… त्याच्या लाडक्या मुंबईत… चित्रपटसृष्टीत… त्याची ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ जपणाऱ्या भारतात…      

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *