Sat. Jun 12th, 2021

… असा रंगला सेटवर मास्क-सॅनिटायझरचा खेळ

”मराठी पाऊल पडते पुढे” सिनेमाच्या चित्रीकरण समारोप प्रसंगी अभिनेता चिराग पाटील आणि सहकलाकारांची धमाल…

सध्या जेमतेम सगळ्या गोष्टी अनलॉक झाल्यामुळे आपल्या आजूबाजूला “न्यू नॉर्मल” चं दृश्य दिसत आहे. मराठी सिनेसृष्टीही हळूहळू अनलॉक होत असून महाराष्ट्रातील अनेक शूटिंग लोकेशनवर मराठी चित्रपटांचे तसेच मालिकांचे चित्रीकरण आपल्याला दिसत आहेत. मराठी कलाकारांनी अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आपल्या कामाला सुरुवात केली. आगामी मराठी चित्रपट “मराठी पाऊल पडते पुढे” याचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले.

सिनेमाच्या टीमने अनोखा खेळ खेळत सिनेमाच्या चित्रीकरणाची सांगता केली. सेटवरील तणावाचे वातावरण कमी करण्यासाठी फावल्या वेळेत चित्रपटचे निर्माते आणि प्रसिद्ध मराठी उद्योजक प्रकाश बाविस्कर यांनी हा हा खेळ खेळण्याचा घाट घातला. लहानपणी जस आपण मुलांची चपळता अजून वाढावी म्हणून “आरसा – टेलीफोन” हा रंजक खेळ खेळायचो त्याचप्रमाणे निर्माते प्रकाश बाविस्करांनी “मास्क-सॅनिटायझर” हा वेगळा खेळ सेटवर खेळला. अभिनेता चिराग पाटील, जेष्ठ अभिनेते अनंत जोग, अभिनेते संजय कुलकर्णी आणि अभिनेते सतीश सलागरे या खेळात सहभागी मंडळींचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. खेळीमेळीचे वातावरण राखत या कोरोनाकाळात आपण आपल्या प्रियजनांची काळजी घ्यावी हे या खेळामागचे उद्देश होते.

मराठी माणसाने व्यवसाय क्षेत्रात उतरत आपली नवी ओळख बनवावी ही या चित्रपटाची कहाणी आहे. निर्माते प्रकाश बाविस्कर हे स्वतः यशस्वी मराठी उद्योजक असून चित्रपट निर्माते म्हणून हा त्यांचा पहिला चित्रपट आहे तसेच अकात डिस्ट्रिब्युशनचे चंद्रकांत विसपुते हे चित्रपटाचे सहनिर्माते असून स्वप्नील मयेकर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचे चिरंजीव अभिनेता “चिराग पाटील” जे बहुचर्चित बॉलिवूड सिनेमा ८३ या मध्ये खुद्द क्रिकेटपटू संदीप पाटील यांची भूमिका बजावणार असून “मराठी पाऊल पडते पुढे” या चित्रपटात देखील मुख्य भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी पाटणे चिरागसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाच्या प्रदर्शनाची माहिती सध्या गुलदस्त्यात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *