Sat. May 25th, 2019

मराठी राजभाषा दिन, भाषा जनाची, भाषा मनाची !

0Shares

आज 27 फेब्रुवारी. संपूर्ण जगभरात साजरा केला जाणारा मराठी राजभाषा दिन. ज्ञानपीठ पुरस्काप्राप्त ( कवी कुसुमाग्रज ) विष्णु वामन शिरवाडकर यांच्या जयंती निमित्त ‘मराठी राजभाषा दिवस’ साजरा केला जातो. म्हणूनच याला मराठी भाषा गौरव दिन असेही म्हटलं जाते. 1987 साली कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, त्यानंतर सरकारने हा दिवस ‘गौरव दिन’म्हणून जाहीर केला.

आपल्या देशात जवळपास 800 भाषा बोलल्या जातात. तर 200 बोलीभाषा बोलल्या जातात.देशातील 7.1% लोक मराठी भाषेत बोलतात. देशात मराठी भाषेचा तिसरा क्रमांक लागतो. मराठी भाषा वळवू तशी वळते. आपल्या मराठी भाषेत एकाच शब्दाचे अनेक अर्थ आहेत. प्रत्येक 15 किलोमीटर अंतरावर मऱाठीचे स्वरूप बदलते. कोकण, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, बीड, जालना, विदर्भ अशाप्रकारे मराठी भाषेचे वेगवेगळे सौंदर्य आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळते.

भारतामध्ये विज्ञान-तंत्रज्ञानाच्या जोरावर डिजीटल युगात वावरणे लोकांची पसंत आहे. त्यामुळे डिजीटल युगाशी कनेक्ट राहताना कुठेतरी मराठी भाषा मागे पडल्याचे जाणवते, परंतु खरं पाहता तसं काही नाही. मराठी भाषा अमृतमय होती आणि अमृतमय राहील.

पूर्वी मराठी वर्ग हा मराठी वाचनालयांतून, सिनेमांगृहातून, नाटकांतून प्रचंड प्रमाणात पाहायला मिळायचा. मग आपला हा मराठी वर्ग गेला तरी कुठं, तर आपला हा मराठी वर्ग कुठेही अलिप्त झालेला नाही.तो याआधी प्रत्यक्षपणे वाचताना दिसायचा आणि आता अप्रत्यक्षपणे डिजीटल माध्यमांमुळे वाचक वर्ग दिसून येत नाही. पण हो, आपला वाचक वर्ग हा आजही आपलाच आहे. वाचक वर्गाचे मराठीवरील प्रेम पूर्वीही तेवढेच होते आणि आजही तेवढेच अतूट प्रेम आहे.

डिजीटल माध्यमांमुळे मराठी वाचकवर्ग अलिप्त न होता, मराठी भाषेशी त्याची आणखी जवळीक निर्माण झाली आहे. आज मराठी कोण वाचतं, असा प्रश्न पडत असला तरी मराठी भाषा प्रेमींसाठी डिजीटल माध्यमांनी अगदी सोपा मार्ग उपलब्ध केला आहे. मराठी वाचक वर्ग आपल्याला हवं असलेलं साहित्य एका क्लिकवर मिळवू शकतात. तसेच आपले मराठी लिखाण साहित्य एका क्लिकवर जगभर प्रसिद्ध करू शकतात.

मराठी भाषेवरील प्रेम, आदर, सन्मान हा नेहमी असाच भरभरत राहो, मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या मित्र- मैत्रिणींना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा………

म माझ्या मराठीचा

म मराठी मातीचा

म मराठी  मनाचा

म मराठी जनाचा

म मराठी माणुसकीचा

म माझ्या महाराष्ट्राचा

माझ्या मराठीला मानाचा मुजरा !!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *