Sat. Jul 31st, 2021

सर्व शाळांत मराठी भाषा अनिवार्य करण्याचा विचार- अजित पवार

महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला मराठी लिहिता-वाचता यावी, यासाठी सर्व शाळांमध्ये मराठी अनिवार्य करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे केली.

उपमुख्यमंत्री आणि अर्थ, नियोजनमंत्री ही पदं मिळाल्यानंतर अजित पवार प्रथमच बारामतीला आले. यावेळी त्यांचं अभूतपूर्व स्वागत करण्यात आलं. यानंतर झालेल्या सभेत अजित पवार यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या.

इंग्लिश मिडियम शाळांमध्ये शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना मराठीबाबत अडचणी येतात, असं पाहणीत दिसून आल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले. या विद्यार्थ्यांचं इंग्लिश चांगलं असतं. मात्र त्यांना चांगलं मराठी बोलता येत नाही किंवा मराठी लिहिता, वाचताही येत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात शिकणारा विद्यार्थी हा हिंदी, इंग्रजी किंवा इतर कोणत्याही माध्यमातून शिकत असला, तरी त्याला पहिली ते दहावीपर्यंत मराठी हा विषय सक्तीचा करण्यात येणार असल्याचा विचार महाराष्ट्र शासन करत असल्याचं पवार यांनी जाहीर केलं.

यावेळी इतरही अनेक प्रकल्पांबद्दल अजित पवार यांनी सुतोवाच केलं. पोलिसांसाठी राज्यात चांगली घरं देण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याचं पवार या सभेत म्हणाले. पूर्वीच्या 180 चौ.फु घरांऐवजी 500 चौ.फु.ची घरं देण्याचा विचार शासनाचा असल्याचं त्यांनी म्हटलं. तसच बारामतीमद्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी घरकूल योजना राबवणार असल्याचंही ते म्हणाले. बारामती रेल्वे स्थानकाचा विकास करणार असल्याचंही अजित पवार यावेळी बोलले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *