आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्याचा ‘मार्ड’चा दावा

कोरोनाच्या वर्षभराच्या संक्रमणानंतरही आरोग्य यंत्रणा सक्षम नसल्याचा दावा निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ या संघटनेने केला आहे. निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील शासकीय आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अत्यावश्यक साहित्याचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे कोरोनाच्या ऐन संक्रमण काळात रुग्णांवर उपचार करणे कठीण होत आहे.
मागील वर्षी कोरोनाच्या संसर्गाला सुरुवात झाल्यानंतर आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी वेगाने प्रयत्न करण्यात आले. त्याचाच भाग म्हणून तात्पुरती कोरोना केंद्रे, कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळही उभारण्यात आली. परंतु, गेल्या वर्षभरापासून राज्यातील साडेचार हजारांहून अधिक निवासी डॉक्टर अविरतपणे कोरोना कक्षांमध्ये सेवा देत आहेत. ही सेवा बजावत असताना आता कोरोना रुग्ण वाढू लागल्याने राज्यातील शासकीय आणि वैद्यकीय महाविद्यालये तसेच रुग्णालयांत सुया, ग्लोव्हज्, अत्यावश्यक औषधे, पीपीई किट्स यांचा तुटवडा भासत असल्याचे मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर ढोबळे पाटील यांनी सांगितले.