पालिका निवडणुकीच्या तोंडावर मविआचे मराठी प्रेम

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली. या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत टाळेबंदी काळात वार्षिक कर भरणाऱ्या स्कूल बसला वाहन करातून १०० टक्के सूट देण्यात आली आहे. तर पाचशे चौरस फुटाच्या घराला मालमत्ता करातून सूट देण्यात आली आहे. दरम्यान दुकानांवर नामफलक यापुढे मराठी भाषेत असणे सक्तीचे असल्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत देखील महत्वाची चर्चा झाली आहे.
राज्य मंत्रिमंडळाने दुकाने व आस्थापन अधिनियम, २०१७ यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मोठ्यांसह छोट्या दुकानांवरील नामफलक हे मराठीत असणे सक्तीचे केले आहेत. त्यामुळे आता सर्व दुकानांवरली नामफलक हे मराठीतच दिसणार आहेत.