ऐन संकटाच्यावेळी कल्याणमधले बहुतांश डॉक्टर्स गायब

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात सर्वत्र लॉकडाऊन केलं असताना अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वैद्यकीय क्षेत्राला मात्र त्यातून वगळण्यात आलंय. कारण सध्याच्या घडीला सर्वांत जास्त आवश्यकता आहे ती डॉक्टरांची. मात्र कल्याण शहरात मात्र याच्या अगदी विरुद्ध चित्र दिसत आहे. कल्याण शहरातील बहुतेक सर्व लहानमोठे दवाखाने बंदच ठेवले असल्याचं दिसून येत आहे. डॉक्टर्सदेखील उपलब्ध नाहीत. त्यामुळे कोरोनाची भीती असताना लोकांनी खासगी रुग्णालयांत गर्दी केली आहे.  

देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी सर्वात जास्त गरज आहे ती डॉक्टरांची. आपल्या प्राणांची पर्वा न करता रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांप्रति, तसंच अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांसाठी जनता कर्फ्यूच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता थाळी वाजवून कृतज्ञता व्यक्त करण्यास पंतप्रधानांनी सांगितलं होतं. मात्र कल्याणमध्ये डॉक्टरच घाबरून घरी बसले असल्याचं चित्र आहे. त्यामुळे कोरोनाचे संशयितच नव्हे, छोटे मोठे आजार असणारे रुग्णदेखील मोठ्या रूग्णालयांत गर्दी करू लागले आहेत. याचा ताण कार्यरत डॉक्टरांवर पडतो आहे. त्यामुळे आणीबाणीच्या परिस्थितीत दवाखाने बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांच्या विरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

Exit mobile version