Mon. Jan 17th, 2022

मेगा भरतीचं गाजर आणि मुळा

गेल्या दशकात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत असल्याचे अनेक सर्वे आणि संशोधन पुढे आले आहेत. त्यामध्ये सरकारी नोकर भरती तर नावालाच सुरू आहे. युती सरकारच्या काळात राज्यात मेगा भरती करण्याची घोषणा तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. ही घोषणा निवडणुकीच्या तोंडावर झाल्याने घोषणेची पूर्तता फडणवीस सरकारला करणे शक्य झाले नाही. त्यानंतर सत्तेत विराजमान झालेल्या महाविकासआघाडीनेही हीच रेघ ओढली. ठाकरे सरकारला दोन वर्ष होऊन गेली, मात्र मेघाभरतीला मुहूर्त मिळाला नाही. त्यामुळेच आम्ही हेडलाईन दिली आहे. मेघा भरतीचं गाजर आणि मुळा…

युती सरकार अर्थात शिवसेना आणि भाजप यांच्या कार्यकाळात तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर सरकारला नोकर भरती करण्याची जाग आली. सर्व विभागाचा आढावा घेतल्यानंतर ७२ हजारांची मेगा भरती करणार अशी घोषणा करण्यात आली. पहिल्या टप्प्यात ३६ हजार आणि दुसऱ्या टप्प्यात ३६ हजार सरकारी नोकर भरती करणार, असे गाजर दाखवून तरुणांना निवडणुकीच्या तोंडावर आकर्षित करण्यात आले.  तत्कालीन सरकारमधील प्रमुख नेत्यांनी केलेल्या घोषणा आजही अनेक तरुणांच्या आठवणीत आहेत. विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि पुन्हा विषय रेंगाळला. युती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुणांना दाखवलेला गाजर, विधानसभा निवडणुकीपर्यंत खाताच आले नाही. निवडणुकानंतर जे काय नाट्य पाहिले त्या नाट्यानंतर पुन्हा तरुणांना अशा लागली, आता तरी मेगा भरती होईल. कारण भाजपावर टीका करणारे तिन्ही पक्ष सत्तेत गेले होते.

महाविकास आघाडी सत्तेत विराजमान झाल्यानंतर संपूर्ण राज्याला एक आशेचा किरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाकडून दिसत होता. त्यांना रोखठोक उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जोड असल्याने तरुणांना नक्कीच मेगा भरती होईल अशी आशा होती. मात्र गेल्या दोन वर्षात मेगा भरती तर सोडाच, साधी भरतीही झाली नाही. उलट ज्या विभागात नोकर भरती करण्यात आल्या त्यामध्ये अनेक घोटाळे समोर आले आहेत. आरोग्य विभागाच्या परीक्षेतील घोटाळा तर थेट आरोग्य मंत्र्यांच्या जिल्हापर्यंत पोहोचला. नागपूरचा पोलीस भरती घोटाळा, म्हाडा परीक्षेचा घोटाळा, एमपीएससीच्या परीक्षेची तारीख पे तारीख अशा या घोटाळेबाज नोकर भरती प्रक्रियेने तरुणांना पूर्ण निराश केले आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी दोन वर्षातील घोटाळेबाज नोकर भरती प्रक्रियेमुळे पूर्ण त्रस्त आहेत. त्यामुळे तरुणांमध्ये चर्चा सुरू आहे, माजी मुख्यमंत्री फडणवीसांनी गाजर दाखवलं आणि विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुळा…

गाजर आणि मुळ्याचा मध्य ‘शिवसेना’

गाजर आणि मुळा दाखवणाऱ्या या दोन सरकारचा मध्य शिवसेना आहे. युती सरकारमध्ये शिवसेना मागच्या सीटवर होती. शिवसेना नोकर भरतीवर वारंवार बोलत होती. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये परिस्थिती बदलली. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री आहेत. तरिही मेगा भरती होत नाही. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिके बद्दल तरुणांमध्ये संशय निर्माण झाला आहे. शिवसेनेला राज्याचे भविष्य आणि कणा असणाऱ्या तरुणांचा संशय दूर करावा लागेल. त्यासाठी लवकरात लवकर मेगा भरतीची प्रक्रिया राबवून तरुणांमध्ये विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे.

– अशोक कारके, औरंगाबाद

( या मताशी संपादक अथवा प्रकाशन संस्था सहमत असतीलच असे नाही. या लेखात लेखकाने मांडलेली मते स्वतंत्र आहेत. )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *