Sun. Oct 17th, 2021

मेहुल चोक्सीनं सोडलं भारतीय नागरिकत्व; प्रत्यार्पण आणखी कठीण होणार

देशातील सर्वात मोठ्या बँकिंग घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीने भारतीय नागरिकत्व सोडलं आहे. पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 14 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या चोक्सीने त्याचा पासपोर्ट एँटिग्वातील भारतीय उच्चायुक्तालयात जमा केला आहे. पीएनबीमधील घोटाळा समोर येताच चोक्सी जानेवारीत देश सोडून पळाला. आता चोक्सीने भारतीय नागरिकत्व सोडल्याने त्याच्या प्रत्यार्पणाची शक्यता धूसर झाली आहे, मेहुल चोक्सीनं आज भारतीय पासपोर्ट जमा करत अँटिग्वाचं नागरिकत्व स्वीकारलं आहे. आता चोक्सी भारतीय नागरिक नसल्याने त्याला भारतात आणणे आणखी कठीण झालं आहे.

विशेष म्हणजे मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पण प्रकरणात उद्याच सुनावणी होणार होती. मात्र त्याआधीच त्याने स्वत:ला अँटिग्वाचा नागरिक घोषित केले. यासाठी त्याने एकूण 177 डॉलरचे हमीपत्र दिले आहे. याबद्दलची माहिती परराष्ट्र मंत्र्यालयाने गृह मंत्रालयाला दिली आहे.
मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाचे प्रयत्न मोदी सरकारकडून सुरू आहेत. मात्र त्याने अँटिग्वाचे नागरिकत्व स्वीकारल्याने या प्रयत्नांना धक्का बसला आहे. चोक्सीने गेल्या सुनावणीवेळी त्याच्या प्रकृतीचे कारण दिले होते. प्रकृती ठिक नसल्याने विमानातून 41 तास प्रवास करुन भारतात येऊ शकत नाही, असे कारण चोक्सीने दिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *