एमआयएमचा राष्ट्रवादीला पाठिंबा

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षासाठी एकेक मत महत्वाचे झाले आहे. असे असतानाच एमआयएमचे दोन पैकी एक मत आपल्याकडे वळविण्यास राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले आहे. एमआयएमचे धुळ्याचे आमदार फारुख शहा यांनी आपण एकनाथ खडसे यांना मतदान करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रथम पसंतीचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे या दोन्ही उमेदवारांचे टेन्शन गेले आहे.
रविवारी संध्याकाळी आमदार फारूख शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेटही घेतली आहे. आमच्या खान्देशचे नेते एकनाथ खडसे यांना आमचे पहिले मत असणार आहे. त्यांनी खान्देशासाठी खूप चांगले केले आहे. त्यामुळे आमचे मत त्यांना असणार आहे. त्यासाठी आम्ही अजित पवारांच्या भेटीला आलो आहोत असे त्यांनी भेटीला जाण्यापूर्वी माध्यामांना सांगितले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेत सध्या ५३ आमदार आहेत. मात्र आमदार अनिल देशमुख आणि आमदार नवाब मलिक हे कारागृहात असून उच्च न्यायालयाने दोघांनाही मतदानाची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मतांची संख्या ५१ वर आली आहे. विजयासाठीचा कोटा २६ असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला ५२ मतांची गरज आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे स्वतःचे ५१, अपक्ष ३ आमदारांचा पाठिंबा आहे. अशात आता एमआयएमच्या फारुख शहा यांनी पाठिंबा जाहीर केल्याने निंबाळकर आणि खडसे यांना आवश्यक मतांसहित अतिरीक्त मतांचाही कोटा पूर्ण झाला आहे.