Tue. Jan 18th, 2022

वादग्रस्त विधानानंतर जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी इंदिरा गांधीबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. एक व्हिडिओ शेअर करत आव्हाडांनी आपल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

काय म्हणाले आव्हाड ?

बीडमधील माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. इंदिरा गांधींना मी आदराने मानतो. माझ्या रक्तामध्ये काँग्रेस आहे. काँग्रेस पक्ष नाही तर लोकचळवळ आहे, महात्मा गांधीजींची चळवळ आहे.

संयुक्त महाराष्ट्रसह मुंबई या निर्णयामागे इंदिरा गांधींजींची प्रमुख भूमिका होती. पंतप्रधान झाल्यानंतर इंदिरा गांधींनी बॅंकेंचं राष्ट्रीयकरण या आणि यासारखे महत्वाची निर्णय आणि कामगिरी त्यांनी केली.

परंतु १९७५ ते १९७७ च्या काळात इंदिरा गांधींच्या निर्णयांमुळे मूलभूत हक्कांवर गदा येत असल्याचं येथील लोकांना वाटत होतं. इंदिरा गांधींच्या या निर्णयाचं काही जणांनी विरोध तर काहींनी समर्थन केलं.

या सर्व प्रकारानंतर विद्यार्थ्यांनी १९७४ साली आंदोलन केलं. या आंदोलनाचं जयप्रकाश नारायण यांनी नेतृत्व केलं. यानंतर १९७७ साली इंदिरा गांधींचा पराभव झाला, हा इतिहास आहे. असं आव्हाड आपल्या व्हिडियोत म्हणाले.

देशात जेव्हा जेव्हा मूलभूत अधिकारांवर गदा आणली जात असल्याचं जेव्हा जनतेला वाटतं, तेव्हा जनता पेटून उठते. आज तेच मोदी-शाह यांच्याविरोधात तेच घडतय.

जर या देशात इंदिरा गांधींचा पराभव होऊ शकतो. इंदिरा गांधीं इतकं कर्तृत्व कोणाचचं नाही. मग मोदी-शाह कोण आहेत ? असा सवालही आव्हडांनी केला.

किरीट सोमय्यांना टोला

मी इंदिरा गांधींचा समर्थक आहे. मला सांगायला लाज वाटत नाही, असं आव्हाडांनी किरीट सोमय्या यांना ठणकावून सांगितलं.

तसेच इंदिरा गांधींची तुलना मोदी-शाह यांच्याशी होऊच शकत नाही, हे सोमय्यांनी लक्षात ठेवावं अशी तंबी आव्हाडांनी सोमय्यांना दिली.

नक्की प्रकरण काय ?

जितेंद्र आव्हाडांनी बुधवारी बीडमध्ये संविधान बचाव रॅलीमध्ये इंदिरा गांधीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

काय म्हणाले होते आव्हाड ?

इंदिरा गांधीनी देशाच्या लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता,असे वादग्रस्त वक्तव्य गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं. 

इतिहासात इंदिरा गांधींनी देशाचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला. तेव्हा देशात कोणीही बोलायला तयार नव्हतं. मात्र अहमदाबादच्या आणि पटनाच्या विद्यार्थ्यानी आवाज उठवला , असंही आव्हाड म्हणाले होते.

या विधानानंतर राज्याच्या राजकारणात वादंग निर्माण झाला. आव्हाडांवर टीका करण्यात आली. आव्हाडांच्या या वक्तव्याबाबत खुलासा मागणार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ता डॉ. राजू वाघमारे यांनी जय महाराष्ट्रशी बोलताना दिली होती.

आव्हाडांच्या वक्तव्यावर सोमय्यांची प्रतिक्रिया

जितेंद्र आव्हाड जे काही बोलले ते खरं बोलले. शिवसेना, शरद पवार आणि काँग्रेस हे आव्हाडांच्या या विधानाशी सहमत असतील असा विश्वास त्यांनी सोमय्या यांनी व्यक्त केला.

संबंधित बातमी : इंदिरा गांधीनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता – जितेंद्र आव्हाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *