Jaimaharashtra news

माहुलमधील प्रदुषण नियंत्रण आणि प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी लवकरच बैठक – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

विविध उद्योग आणि रासायनिक प्रकल्पांनी वेढलेल्या माहुल भागातील प्रदुषण नियंत्रण करण्यासाठी, अतिप्रदूषीत भागातील घरांचे पुनर्वसन करण्यासाठी संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे.

याबाबतची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.

ही संयुक्त बैठक लवकरच म्हाडा, मुंबई महापालिका आणि पर्यावरण विभाग यांच्यात घेतली जाणार आहे, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

पर्यावरण मंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात पर्यावरण विभागाच्या महत्वाच्या मुद्दयांवर आढावा बैठक घेतली गेली. यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते.

या बैठकीला पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव, सदस्य सचिव ई. रवींद्रन आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होते.

माहुलमधील वाढत्या प्रदुषणाचा परिणाम हा फक्त त्या भागापुरता मर्यादीत नसून मुंबईतील इतर भागातही होतोय.

उद्योग आवश्यक आहेतच, पण त्याबरोबर पर्यावरणाचे रक्षणही आवश्यक आहे, असे पर्यावरण मंत्री म्हणाले.

त्या अनुषंगाने माहुल भागातील उद्योग हे पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने आवश्यक निकषांची पुर्तता करतात की नाही याची पडताळणी केली जावी, अशी सूचना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.

सांडपाणी व्यवस्थापन, ग्रीन झोनची निर्मिती, हवेचे प्रदुषण कमी करण्यासाठीच्या उपाययोजना आदींची अंमलबजावणी करण्यात यावी, असेही आदित्य ठाकरेंनी सांगितले.

तसेच तेथील अतिप्रदुषीत आणि धोकादायक भागातील घरांचे पुनर्वसन जलद गतीने करण्याच्या अनुषंगाने म्हाडा, मुंबई महापालिका, उद्योग, पर्यावरण इत्यादी संबंधीत विभागांची संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न सोडविण्यात येईल.

यासाठीच्या बैठकीचे आयोजन तातडीने करण्याची सूचना आदित्य ठाकरेंनी अधिकाऱ्यांना दिली.

पर्यावरण रक्षण ही लोकचळवळ व्हावी

पर्यावरण रक्षणाचा कार्यक्रम हा फक्त शासकीय यंत्रणांपुरता मर्यादीत न राहता , लोकचळवळ होण्याची गरज आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

या मोहीमेत जनजागृती आणि लोकसहभाग वाढवण्याबरोबरच स्वयंसेवी संस्था, तरुण, विद्यार्थ्यांचा सहभाग घेण्यासाठी भर देण्यात यावा, असेही मंत्री पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.

या बैठकीत पर्यावरण विभागाच्या विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने यावेळी सादरीकरण करण्यात आले.

Exit mobile version