Sun. Oct 24th, 2021

पावसाळी अधिवेशनासाठी आलेल्या 3 आमदारांना चोरट्यांनी लुटलं !

पावसाळी अधिवेशनासाठी मुंबईत आलेल्या तीन आमदारांनाच चोरट्यांनी लुटल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याबाबात तिन्ही आमदारांनी रेल्वे प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

पावसाळी अधिवेशनासाठी मुंबईत आलेल्या तीन आमदारांनाच चोरट्यांनी लुटल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याबाबात तिन्ही आमदारांनी रेल्वे प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

काय घडलं या आमदारांसोबत नेमकं?

पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने बुलडाणा जिल्ह्यातील चिखली मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार राहुल बोन्द्रे तसंच शिवसेनेचे संजय रायमूलकर शशिकांत खेडेकर हे आमदार मुंबईला आज सकाळी पोहचले.

आमदार बोन्द्रे हे काल मलकापूर येथून विदर्भ एक्स्प्रेसमध्ये मुंबईला जाण्यासाठी बसले होते. सोबत त्यांच्या पत्नी वृषाली बोन्द्रे सुद्धा होत्या.

आमदार बोन्द्रे हे आज सकाळी साधारण 6 ते 7 च्या दरम्यान जेव्हा कल्याण स्टेशनला उतरत असतानाच चोरट्याने त्यांच्या पत्नी वृषाली जवळील पर्स हिसकावून पळवली.

तसंच आमदार बोंद्रेंजवळील महत्वाच्या कागदपत्रांची फाईलही पळवली.

बोन्द्रे यांनी चोरट्याचा पाठलाग करून पर्स मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरट्याने हिसका देऊन पळ काढला.

पर्समधील 26 हजार रुपये, ATM कार्ड सह इतर साहित्य घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.

शिवसेनेच्या आमदारांनाही आला असा अनुभव!

शिवसेनेचे आमदार संजय रायमूलकर आणि शशिकांत खेडेकर हे जालन्यावरून देवगिरी एक्स्प्रेसने मुंबईला पोहचले.

आमदार रायमूलकर हे कल्याण स्टेशनला उतरणार असल्याने सकाळी उठले, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, की त्यांचा मोबाईल आणि खिशातील 10 हजार चोरट्याने लंपास केले होते.

सोबत असलेले आमदार खेडेकर यांची बॅग समजून चोरट्याने त्यांच्या बॅगला ब्लेडने कापले. हा संपूर्ण प्रकार कल्याण स्टेशन ते ठाणे स्टेशन दरम्यान घडला असल्याचं रायमूलकर यांनी सांगितलं.

या तिन्ही आमदारांनी घडल्या प्रकाराबद्दल रेल्वे प्रशासनाला जाब विचारला आहे. अधिवेशन काळात आमदारासाठी राखीव असलेल्या बोगीत चोर शिरतातच कसे? रेल्वेतील पोलीस कुठे जातात? असा सवाल करत त्यांनी नाराजी व्यक्त केलीय. आमदारांनी चोरीची तक्रार CST च्या लोहमार्ग पोलिसांना दिलीय. मात्र जर लोकप्रतिनिधींनाही अशा प्रकारे लुटलं जात असेल, तर सामान्य नागरिकांची काय अवस्था असेल, हे देखील यानिमित्ताने विचारात घ्यायला हवं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *