Thu. Sep 19th, 2019

‘राज’पुत्र आमित ठाकरे आज विवाहबंधनात अडकणार, दिग्गजांची उपस्थिती

196Shares

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे हे मिताली बोरुडे यांच्याशी आज म्हणजेच रविवारी विवाहबद्ध होणार आहेत.

‘राज’पुत्राच्या विवाह सोहळ्याला राजकीय नेत्यांसह, उद्योग, चित्रपट तसेच इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

लोअर परळ येथील येथील सेंट रेजिस या आलिशान हॉटेलमध्ये हा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे.

आज दुपारी 12 वाजून 51 मिनिटांनी अमित आणि मिताली विवाहबद्ध होत आहेत. शनिवारी संध्याकाळी राज ठाकरे यांचे निवासस्थान कृष्णकुंज येथे नातेवाईकांच्या उपस्थितीत हळदीचा कार्यक्रम पार पडला.

2 दिवसांपासून कृष्णकुंज इमारतीला आणि इतर परिसराला रोषणाई करण्यात आली आहे. कृष्णकुंज इमारतीला फुलांचीही सजावट करण्यात आली आहे.

राज ठाकरेंनी मुलगा अमित ठाकरेच्या लग्नाची पत्रिका स्वतः त्यांचे बंधू आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी नेऊन दिली.

उद्धव ठाकरे सहकुटुंब या विवाह सोहळ्याला हजर राहणार आहेत अशीही माहिती आहे. त्याचप्रमाणे भाजपा, काँग्रेसमधल्या नेत्यांनाही या लग्नाला निमंत्रित करण्यात आले आहे.

फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह या दोघांना या लग्नासाठी निमंत्रण देण्यात आलेले नाही अशीही माहिती आहे.

काही दिवसांपूर्वीच नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरेंनी मुलाच्या लग्नाच्या पत्रिका सप्तश्रृंगी देवीच्या चरणी ठेवली.

गेल्याच वर्षी डिसेंबर महिन्यात अमित-मिताली यांचा साखरपुडा पार पडला. मिताली बोरुडे फॅशन डिझायनर आहे.

मिताली बोरुडेने फॅड इंटरनॅशनलमधून फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे. ती प्रसिद्ध सर्जन संजय बोरुडे यांची कन्या आहे.

राज ठाकरेंची कन्या उर्वशी आणि मिताली यांची चांगली मैत्री आहे. काही वर्षांपूर्वी या दोघींनी मिळून ‘द रॅक’ हा कपड्यांचा ब्रॅण्ड लॉन्च केला होता.

अमित आणि मिताली यांची ओळख जुनी आहे. याच ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले आता ते दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत.

196Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *