Thu. Feb 25th, 2021

‘देशात लोकशाही टिकणार का हुकूमशाही येणार हे ठरवणारी ही निवडणूक’, राज ठाकरेंचा हल्लाबोल!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात आक्रमकपणे जाहीर सभा घेणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सातारा येथे आजच्या सभेतही पंतप्रधानांवर जोरदार हल्लाबोल केला. आपण लोकसभा निवडणुकीला उभे राहत नसलो, आपला कोणताही उमेदवार नसला, तरी देशावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आपण बोलतच राहू, असं राज यांनी ठणकावून सांगितलं. शिवछत्रपतींच्या प्रेरणेनेच आपण हे करू शकतो असंही त्यांनी जाहीर केलं. मोंगलाविरोधात, ब्रिटिशांविरोधात पहिला उठलेला आवाज हा महाराष्ट्रातून होता, तर मोदी आणि शाह यांच्याविरुद्ध महाराष्ट्रातूनच आवाज उठणार असंही त्यांनी निक्षून सांगितलं.

या सभेतही मोदी आणि भाजप नेत्यांच्या भाषणांच्या, मुलाखतींच्या क्लिप्स Audio Visual माध्यमातून दाखवत राज ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला. इतिहासातील उदाहरणं देत बेसावध राहिलात, तर मोदी आणि शाह तुमचं जिणं हराम करतील, असा इशाराही त्यांनी जनतेला दिला.

काय म्हणाले साताऱ्यात राज ठाकरे?

नरेंद्र मोदी देशाच्या इतिहासातले एकमेव पंतप्रधान, जे गेल्या 5 वर्षांत एकदाही पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जायला तयार नाहीत.

रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पासून ते मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता मोदींनी या देशावर नोटाबंदी लादली. मोदींनी नोटबंदींनी काय साधलं?

नोटबंदीने 4 ते 5 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, काळा पैसा होता तसाच आहे. भाजपचं सेव्हन स्टार कार्यालय दिल्लीत उभं राहिलं.

“शहीद सैनिकांचा वापर पंतप्रधान करतात राजकीय फायद्यासाठी”

सैनिक अत्यंत कठीण परिस्थितीत देशांच्या सीमांचं रक्षण करत असतात.

शहीद जवानांचा वापर राजकीय फायद्यासाठी करून घेताना पंतप्रधानांना लाज वाटत नाही?

मोदींच्या हातात पूर्ण सत्ता असताना पुलवामा हल्ला झालाच कसा, या  प्रश्नाची उत्तरं तुम्ही कधी देणार?

15 एप्रिलला RSTV च्या मुलाखतीत नरेंद्र मोदी म्हणाले की शेतकरी आत्महत्या हा जर निवडणुकांचा मुद्दा होऊ शकतो तर शहीद जवान का होऊ शकत नाही?

मोदी सत्तेत आल्यावर जेवढे सैनिक शहीद झालेत तेव्हढे सैनिक ह्याच्या आधी कधी झाले नव्हते. पाकिस्तानला जशास तसं उत्तर देऊ असं सत्तेत येणाच्या आधी म्हणणारे मोदी, स्वतःच्या शपथविधीला नवाझ शरीफना बोलवतात, त्यांना केक भरवतात. मला सांगा शहीद जवानांच्या कुटुंबियांना काय वाटलं असेल?

सैन्याच्या नावावर राजकरण करणाऱ्या मोदींनी सैनिकांना माफी मागायला लावली आणि त्यांच्यावर केसेस टाकल्या.

काश्मीरमध्ये जवानांवर लोकांनी हल्ले केले आणि जवान का शांत बसले कारण सरकार त्यांच्या पाठीशी ठाम उभं राहणार नाही, हे त्यांना माहीत होतं.

“सैनिकांच्या पत्नींबद्दल अनुद्गार काढणारा परिचारक अजून भाजपमध्येच”

जवानांच्या पत्नींबद्दल अनुद्गार काढणारा भाजप आमदार परिचारक अजूनही भाजपमध्येच आहे.

हाच परिचारक आजच्या नरेंद्र मोदींच्या अकलूजच्या सभेत उभा असतो.

मोदी म्हणाले होते की व्यापारी हा सैनिकांपेक्षा जास्त शूर असतो.

पाकिस्तनाचा पंतप्रधान इम्रान खान म्हणतोय की नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान व्हायला पाहिजेत. आजपर्यंत हे कधी घडलं नाही.

“मोदी आणि शाह यांना राजकीय क्षितिजावरून हटवूया”

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात जवान मारले गेल्यावरही मोदी डिझायनर कपड्यात हसत फिरत होते.

एवढं घडलेलं असताना मोदी कोरियामध्ये अवॉर्ड घ्यायला गेले.

नोटाबंदीनंतर ज्यावेळी देशात लोक रांगेत उभे होते, शेकडो माणसांचे जीव गेले. त्यावेळी मोदी पुरस्कार स्वीकारायला जपानला गेले.

शहीद जवानांच्या जीवावर लोकांकडे मोदी मागत आहेत, airstrike करणाऱ्या पायलट्सच्या जीवावर मतं मागत आहेत. पण 5 वर्षांपूर्वी जे बोलले त्यावर काही बोलत नाहीत.

म्हणून मोदी आणि शाह यांना राजकीय क्षितिजावरून हटवूया.

पण त्यांना मदत होईल अशा कोणालाही मतदान करू नका.

बेसावध राहू नका. देशात लोकशाही टिकणार का हुकूमशाही येणार हे ठरवणारी ही निवडणूक आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *