Fri. Oct 7th, 2022

महापालिका निवडणुकांमध्ये मनसे स्वबळावर

मुंबई महापालिका निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. मुंबईसह राज्यातील सर्वच महापालिका निवडणुका मनसे स्वबळावर लढवणार असल्याची माहिती मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली आहे. त्यामुळे शिंदे गट-मनसेची युती होऊन भाजप त्यांच्यासाठी जागा सोडणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे. बीएमसीमध्ये एकूण २२७ जागा आहेत. या सर्वच जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानेच पक्ष राज्यभरात एकट्याने महापालिका निवडणुका लढवणार असल्याचे कळते आहे. राज ठाकरे लवकरच विदर्भ दौऱ्यावर रवाना होणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर, औरंगाबादसह राज्यातील सर्वच मुख्य महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, पक्षाच्या कार्यकर्त्यांना चैतन्य देण्यासाठी अनेक वेळा पक्षनेतृत्वाकडून स्वबळाची हाक दिली जाते. मात्र महापालिका निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. त्यांना अवकाश असल्यामुळे आता जरी स्वबळाची घोषणा केली असली, तरीही भविष्यात युती होऊ शकते, असा अंदाज राजकीय विश्लेषकांनी वर्तवला आहे.

आगामी निवडणुकांमध्ये मनसे आणि भाजप हातमिळवणी करणार असल्याच्या चर्चा सुरुवातीला होत्या. राज ठाकरे आणि भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्यामुळे तशा चर्चांना उधान आले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि मनसे यांची युती होणार असल्याचं वृत्त आले. भाजप महायुती करण्याऐवजी शिंदे-मनसे युतीचा बाहेरुन पाठिंबा घेण्याची चर्चा रंगली. मात्र या सर्व शक्यता धुडकावून लावणारं मनसेच्या स्वबळाच्या नाऱ्याचं वृत्त आता समोर आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.