Tue. Dec 7th, 2021

‘डॉ. काशिनाथ घाणेकर’साठी मनसे आक्रमक, खळ्ळ खट्याकचा इशारा

कल्याणमध्ये मल्टिप्लेक्स चालकांविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. अभिजित देशपांडे दिग्दर्शित ‘…आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपट सध्या बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. मात्र या चित्रपटाला प्राईम टाईम शो न दिल्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे. सिनेमाला तात्काळ प्राईम टाईम म्हणजेच संध्याकाळच्या वेळेतील शो न दिल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा मल्टिप्लेक्सना देण्यात आला आहे. डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेमाला प्राईट टाईम द्या, अन्यथा पीव्हीआर व सिनेमॅक्समध्ये तोडफोड करू, असा इशारा कल्याण मनसे शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांनी दिला आहे. काशीनाथ घाणेकर या चित्रपटाचा दिवसभरात केवळ एकच शो होत असल्याने याबाबत प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मराठी रंगभूमीवरील पहिले सुपरस्टार अभिनेते ‘काशिनाथ घाणेकर’ यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा 8 नोव्हेंबरला रिलीज झाला. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. कल्याणमध्ये बहुंताश परिसर हा मराठी भाषिक आहे, मात्र सिनेमॅक्स थिएटरमध्ये या सिनेमाचा शो केवळ दुपारी 3 वाजताच आहे. यामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तसेच दुसरीकडे अमिताभ बच्चन-आमिर खान यांच्या ठग्ज ऑफ हिंदोस्तान या चित्रपटाचे दिवसभरात तब्बल 8 शो सुरू आहेत. सिनेमामध्ये मोठी स्टारकास्ट आहे, मात्र कथेमुळे प्रेक्षकांची निराशा झाल्याने ठग्ज ऑफ हिंदोस्तानकडे पाठ फिरवली गेली आहे. या चित्रपटाच्या तुलनेत काशीनाथ घाणेकर चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे पण थिएटरमध्ये या चित्रपटाला प्राईम टाईमच देण्यात आलेला नाही. याविरोधातच मनसे आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर चित्रपटांना आज दुपारपर्यंत प्राईम टाईम न मिळाल्यास मल्टिप्लेक्स फोडण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *