मनसेचे सुहास दाशरथे यांचा भाजपात प्रवेश

औरंगाबादेत महाराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मनसेची सभा पार पडणार आहे. मात्र, राज ठाकरे यांच्या सभेपूर्वीच मनसेला मोठा धक्का बसला आहे. औरंगाबाद येथील मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुहास दाशरथे यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
मागील डिसेंबर महिन्यात राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा झाली होती, यावेळी सुहास दाशरथे यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर आज मनसेतून बाहेर पडत सुहास दशरथे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी, भाजपचे नेते आणि अर्थराज्य मंत्री भागवत कराड हे देखील उपस्थित होते.
‘सभा ठरलेल्या दिवशीच होणार’
दरम्यान, मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी राज ठाकरे यांच्या औरंगाबाद दोऱ्याविषयी माहिती दिली आहे. औरंगाबादमधील मनसेची सभा ठरलेल्या दिवशीच होणार असल्याचे वक्तव्य नितीन सरदेसाई यांनी केले आहे.
‘पोलीस आयुक्त सभेबाबत निर्णय घेतील’ – गृहमंत्री
महाराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादेत सभा पार पडणार आहे. मात्र, अद्याप राज ठाकरे यांच्या सभेला पोलिसांची परवानगी मिळाली नाही, याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. औरंगाबादेत राज ठाकरे यांच्या सभेबाबत पोलीस आयुक्त येत्या दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले आहेत.