Jaimaharashtra news

मोदी सरकारने रब्बी पिकांचा हमीभाव वाढवला

नवी दिल्ली – केंद्र सरकारने २०२२-२३ या वर्षासाठी रब्बी पिकांची किमान आधारभूत किंमत (MSP) वाढवली आहे. यात गहू, हरभरा, मसूर, सूर्यफूलांच्या किंमतीत वाढ केली. गव्हाची किमान आधारभूत किंमत ४० रुपयांनी वाढवून प्रति क्विंटर २ हजार १५ रुपये इतकी केली आहे. इतर सर्व प्रमुख रब्बी पिकांच्या किंमतीतही वाढ केली आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मोहरीच्या किमान आधारभूत किंमत मध्ये ४०० रुपये प्रति क्विंटल अशी वाढ केली आहे. यामुळे मोहरीची किमान आधारभूत किंमत ५ हजार ५० रुपये प्रति क्विंटल इतकी झाली आहे. वनस्पती तेलाच्या उत्पादनात वाढीसाठी यामुळे मदत होणार आहे.

हरभरा आणि मसूरच्या किमान आधारभूत किंमत मध्ये मोठी वाढ झाली असून हरभऱ्याच्या दरात प्रति क्विंटल १३० रुपये तर मसूरच्या दरात ४०० रुपये वाढ केली आहे. यामुळे हरभऱ्याची एमएसपी ५ हजार २३० रुपये तर मसूरची किमान आधारभूत किंमत ५ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल इतकी झाली आहे.

Exit mobile version