Fri. Sep 30th, 2022

पावसाळी अधिवेशन स्वातंत्र्य दिनानंतर

राज्यात मोठ्या सत्तांतरणानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाने नवे सरकार स्थापन झाले. या नव्या सरकारचे विधीमंडळाचे पहिले पावसाळी अधिवेशन १० ऑगस्टपासून सुरु होणार होते. मात्र राज्य मंत्रिमंडळाच्या रखडलेल्या विस्तारामुळे हे पावसाळी अधिवेशन एक आठवडा पुढे ढकलण्यात आले आहे. ज्यानंतर अधिवेशनासाठी नवा मुहूर्त शोधण्यात आला आहे. त्यानुसार येत्या १७ ते २६ ऑगस्टपर्यंत विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन पार पडणार आहे. याबाबत मंगळवारी आज विधान भवनात कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे. ज्यात अधिवेशनाच्या तारखांवर शिक्कामोर्तब केला आहे.

एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार राजभवनात पार पडला आहे. यानंतर दुपारी सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर विधान भवनात अधिवेशनाच्या कामकाज निश्तित करण्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित केले आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी ११ वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. या विस्तारानंतर प्रत्येक मंत्र्याला आपल्या पदाचे कामकाज जाणून घेण्यासाठी चार दिवसांचा कालावधी गरजेचा असतो. त्यामुळे अधिवेशनाच्या तारीख पुढे ढकलण्यात आल्याचे बोलले जात आहे. यानुसार राज्याचे विधीमंडळाचे आगामी अधिवेशन स्वातंत्र्य दिनानंतर होणार आहे. म्हणजेच १७ ऑगस्ट ते २६ ऑगस्टपर्यंत होण्याची शक्यता आहे.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानमंडळ सचिवालयाने मोहरमच्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही आपले कार्यालय सुरु ठेवले आहे. तसेच ९ ते १८ ऑगस्ट या कालावधीत रजेवर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी पावसाळी अधिवेशन १८ जुलै रोजी होईल असे घोषित केले होते. मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.