Thu. Sep 29th, 2022

पाऊस Updates : अतिवृष्टीमुळे मुंबई उपनगर जिल्ह्यात सुट्टी जाहीर

मुंबई मध्ये काल रात्री पासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईतील सखल भागात पाणी साठलेलं आहे. अंधेरी सबवे परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले पाहायला मिळतंय. मुंबईत सातत्याने होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुंबई उपनगर जिल्ह्यात आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अतिवृष्टी होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुख्याध्यापक, प्राचार्यांनी आज सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवावीत. तसंच जे विद्यार्थी शाळेत आलेले असतील, त्यांना सुखरूप पालकांच्या हाती देऊनच शाळा सोडावी. नागरिकांनी आवश्यक असेल तरच बाहेर पडावे, असे आवाहनही श्री. बोरीकर यांनी केलंय.

पुढील 24 तासात मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे गरज असल्यासच मुंबईकरांनी घराबाहेर पडावं असं प्रशासनाने आवाहन केलं आहे. तसंच समुद्रकिनारी आणि साचलेल्या पाण्यात जाऊ नये असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलंय. हवामान विभागाचा अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे मुंबई शहर व उपनगरांतील  दुसऱ्या सत्रातील शासकीय व खासगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय.

ठाणे शहरात कोसळणाऱ्या पावसामुळे ठाणेकरांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. ठाणे जिल्हातही फारशी चांगली स्थिती नाहीये. ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, भिवंडी अश्या शहरांमध्येही पाणी साचलं असून रेकॉर्डब्रेक पाऊस झालाय.

ठाणे जिल्ह्यात पडलेल्या पावसाने संपूर्ण मोसमाची सरासरी अवघी 3 महिन्यातच ओलांडलीये.

उत्तर रत्नागिरीत पावसाचा जोर कायम आहे. खेड, दापोली याठिकाणी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने तळ ठोकला आहे. या मुसळधार पावसामुळे त्याठिकाणी असलेल्या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सुरक्षतेच्या दृष्टीने मुंबई गोवा महामार्गावरील खेड जगबुडीचा पुल वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे, तर पुलावरती पोलीस तसेच मदत ग्रुपचे रक्षक तैनात करण्यात आले आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

पालघर येथे सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे पाचही दरवाजे एका मीटरने उघडले आहेत. सूर्या नदीत पाण्याचा विसर्ग वाढवला. धामणी आणि कवडास धरणांमधून 42600 क्यूसेक पाण्याचा सूर्या नदीत विसर्ग झालाय. सूर्या नदी तीरावर वसलेल्या 65 पेक्षा जास्त गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.