नाना पटोले यांच्याविरोधात आंदोलन

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे विरोधकांकडून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. नाना पटोले यांच्या बेताल बडबडीचा भाजपकडून निषेध करण्यात आला असून नागपूरमध्ये नाना पटोले यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले.
भंडारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारसभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले. ‘मी मोदीला मारुही शकतो आणि शिव्याही देऊ शकतो’, असे वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे नाना पटोले वादात सापडले आहे. याप्रकरणामुळे विरोधक पटोलेंवर निशाणा साधत आहेत.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट केले की, ‘पाकिस्तानच्या सीमेनजीक पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा २० मिनिटे खोळंबून राहतो, तेथील काँग्रेसचे मुख्यमंत्री त्याची दखलसुद्धा घेत नाहीत. आता महाराष्ट्राचे काँग्रेस अध्यक्ष म्हणतात, मी मोदींना मारू शकतो, शिव्या देऊ शकतो.’
‘काँग्रेस पक्षाचे चालले तरी काय? कधीकाळी स्वातंत्र्याच्या आंदोलनात असणारा हा पक्ष इतक्या रसातळाला? काँग्रेसला आता लोकशाहीतील राजकीय पक्ष म्हणायचे की दहशत पसरविणारे संघटन? नानाभाऊ केवळ शारिरीक उंची असून चालत नाही, वैचारिक-बौद्धिक उंचीपण असावी लागते,’ असे ट्वटि फडणवीसांनी केले.