CAA आणि NRC विरोधात वंबआचे दादर येथे धरणे आंदोलन,वाहतुकीत बदल

सध्या नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात विविध ठिकाणी आंदोलने आणि निदर्शने पहायला मिळत आहेत.
या पार्श्वभुमीवर CAA आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी NRC चा विरोध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने पक्षप्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी बारा वाजता दादर टीटी येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनात हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग असणार आहे. हा सहभाग पाहता त्याचा वाहतुकीवर परिणाम होऊन वाहतुक कोंडी निर्माण होऊ शकते, यासाठी वाहतूक पोलिसांच्या वतीने आज सकाळपासून ते रात्री बारा दरम्यान वाहतूक मार्गात काही बदल करण्यात आलेले आहेत.
सध्या दादर टीटी येथील वाहतूक सुरळीत सुरू आहे. मात्र दुपारनंतर कार्यकर्ते जमायला सुरुवात झाल्यावर वाहतुकीत बदल केले जातील.
मार्गात कोणते बदल करण्यात आले आहेत ?
दादर पश्चिमेकडे वरळीला जाणाऱ्या वाहतुकीसाठी टिळक पूल बंद करणार असून येथील वाहतूक दादर टीटी फ्लाईओवर दक्षिण वाहिनीने परळ टीटी फ्लायओवर दक्षिण वाहिनीने परळ टीटी खालून वळण घेऊन एलफिस्टन पुलावरून पुढे जाईल.
ज्या वाहनाला पश्चिमेस जायचे आहे त्यांना डॉक्टर बी ए रोड दक्षिण वाहिनी सायन रुग्णालय येथून उजवे वळण घेऊन कुंभारवाडा चौक, माटुंगा रेल्वे स्टेशन पुढे कटारिया रोड ने मार्गक्रमण करता येईल असे सांगण्यात आलेले आहे.