Tue. May 11th, 2021

‘सरकार मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रीपरिषद चालवतायेत की…’ – संभाजीराजे

हे सरकार मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रीपरिषद चालवत आहे की सरकारी बाबू, असा संतप्त सवाल खासदार संभाजीराजे यांनी केला आहे. संभाजीराजे यांनी सोमवारी मराठा आंदोलक तरुणांची भेट घेतली यावेळेस ते बोलत होते.

मराठा तरुणांची निवड होऊनही कामावर नियुक्ती करण्यात आलेली नाही. लवकरात लवकर नियुक्ती करण्यात यावी,यासाठी अनेक दिवसांपासून मराठी तरुण धरणे आंदोलन करत आहेत.

आझाद मैदानावर गेल्या ३४ दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनकर्त्या मराठा समाजाच्या तरुणांची संभाजीराजेंनी आज भेट घेतली. या भेटीनंतर संभाजीराजेंनी माध्यमांशी संवाद साधला.

काय म्हणाले संभाजीराजे ?

संभाजीराजे भोसले यांनी या सर्व आंदोलनकाऱ्यांची बाजू समजून घेतली. तसेच या संदर्भात बैठक होणार आहे. तोडगा निघत नाही, म्हणून मी आलोय.

तसेच आरक्षण जाहीर केल्यावर 16 टक्के आरक्षणामधून ज्या 3 हजार 500 तरुणांना नोकरीसाठी कॉल आला. पण त्यांना काम मिळालं नाही.

मला कोणत्याही सरकारला दोष द्यायचा नाही. पण आता या तरुणांना न्याय कुणी द्यायचा? हे सरकार कोण चालवतं, मुख्यमंत्री की अधिकारी, असा सवालही संभाजीराजे यांनी केला.

तसेच मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक घेणार आहे, त्यातून समाधानकारक मार्ग निघेल अशी माझ्यासह सर्वांची अपेक्षा आहे, असंही संभाजीराजे म्हणाले.

दरम्यान सरकार उमेदवारांच्या नियुक्त्या करत नाही, तोपर्यंत आंदोलन करण्याचा पवित्रा मराठा समाजातील तरुणांनी घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *