Thu. Jun 17th, 2021

मुंबईतील मालाडमध्ये रहिवासी इमारत कोसळून दुर्घटना

मुंबई: मुंबईतील मुसळधार पावसामुळे मालाडमधील एका इमारतीचा भाग कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. बुधवारी रात्री उशिरा मालाडमधील मालवणी भागात एक इमारत दुसऱ्या इमारतीवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून १७ जण गंभीर जखमी आहेत.

मालाडमधील मालवणी येथील गेट क्र. ८ येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली सापडलेल्या ११ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १७ जणांना ढिगाऱ्याखालून वाचवण्यात यश आलं आहे.

या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुर्देवाने या मृतांमध्ये ६ लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई महापालिकेसह इतर प्रशासन घटनास्थळी दाखल झालं आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य अद्यापही सुरु आहे. सध्या या ठिकाणी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.

मध्यरात्रीपर्यंत ढिगाऱ्याखालून जवळपास १६ जणांना रेस्क्यू करण्यात आलं होतं. ज्यात तीन लहान मुलं, तीन महिला आणि दहा पुरुषांचा समावेश होता.
या इमारतीत एकूण दोन ते तीन कुटुंब राहत असल्याची माहिती मिळत आहे. येथील रहिवाशांना तातडीने अन्यत्र हलवण्यात येत असून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *