सोमवार ठरला मे महिन्यातील विक्रमी पावसाचा दिवस

मुंबई: मुंबईच्या किनाऱ्यावर प्रत्यक्ष न धडकताही तौक्ते चक्रीवादळाने सोमवारी मुंबईला तडाखा दिला. मुंबईसाठी मे महिन्यातील हा विक्रमी पावसाचा दिवस ठरला. मुंबईत सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सरासरी १९४ मिमी पाऊस झाला तर सरासरी १०८ किमी ताशी वेगाने वारे वाहिल्याची नोंद हवामान विभागाच्या कुलाबा वेधशाळेने केली आहे.

चक्रीवादळाचा परिणाम रविवारी सायंकाळपासूनच मुंबईवर दिसू लागला होता. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी रविवार रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावली. मुंबईचा सोमवारचा दिवस उजाडला तोच कुंद वादळी हवा, सोसाटय़ाचा वारा आणि मुसळधार पावसासह. सकाळपासून सुरू झालेली संततधार अगदी रात्री उशिरापर्यंत टिकून होती.

या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मे महिन्यातील सर्वाधिक पावसाचा विक्रम सोमवारी झाला. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सोमवारी सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सरासरी १९४ मिलिमिटर पावसाची नोंद हवामान विभागाच्या सांताक्रुझ केंद्राने केली. त्यानंतरही रात्री उशिरापर्यंत अनेक भागांत पाऊस कोसळत होता. यापूर्वी आतापर्यंतच्या मे महिन्यातील पावसाची सर्वाधिक नोंद ही १९ मे २००० रोजी करण्यात आली होती. त्या दिवशी सरासरी १९०.८ मिमी पाऊस झाला होता. मात्र हा विक्रम तौक्तेच्या परिणामांमुळे मोडीत निघाला. कुलाबा केंद्राने सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सरासरी १८९.२ मिमी पाऊस नोंदवला. मध्य आणि दक्षिण मुंबईतील अनेक भागांत २०० मिमीपेक्षाही अधिक पावसाची नोंद झाली.

 

Exit mobile version