डॉक्टर जोडप्याचा अनोखा उपक्रम

मुंबई: मुंबईतील कफ परेड येथील एका डॉक्टर जोडप्याने अवघ्या बरे झालेल्या रूग्णांकडून १० दिवसामध्ये २० किलो न वापरलेली कोरोनाची औषधे गोळा केली आहेत. Sars-CoV-२ चा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचारासाठी ही औषधे देशभरातील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रांना देण्यात येणार आहेत.

१ मे रोजी डॉ. मार्कस रॅनी आणि त्यांची पत्नी डॉ. रैना या दोघांनी कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची न वापरलेली औषधे गोळा करण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला. या मोहिमेची सुरुवात त्यांनी त्यांच्या इमारतीपासून केली. सुमारे १०० इमारतींमधील रहिवाशांनी त्यांची न वापरलेली औषधे दान केली आहेत.

‘देशभरातील कोरोना रुग्णांना औषधांच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. तर मग अगदी एक डोस का वाया घालवायचा? याचा सर्वाधिक वापर ग्रामीण आणि आदिवासी भागात राहणाऱ्यांवर उपचार करण्यासाठी केला जाऊ शकतो. या उपक्रमातून आम्हाला अशा वंचितांना मदत करायची आहे’, असे डॉ. रॅनी म्हणाले.

मागील वर्षी बृहन्मुंबई महानगरपालिकेसोबत रूग्णांच्या तपासणी आणि उपचारासाठी या दांपत्याने दादरच्या झोपडपट्टीत काम केले होते.

Exit mobile version