Fri. Oct 7th, 2022

मुंबई विमानतळाचे मुख्यालय मुंबईतच; अदानी उद्योग समूहाचे स्पष्टीकरण

मुंबई विमानतळाचे मुख्यालय मुंबईतच असल्याचं स्पष्टीकरण अदानी उद्योग समूहाने दिलं आहे. मुंबई विमानतळाचे मुख्यालय अहमदाबादेत नेल्याच्या वृत्त फेटाळण्यात आले आहे. अदानी उद्योग समूहाने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

‘मुंबई विमानतळाचे मुख्यालय अहमदाबादेत हलवण्याच्या बातमीच्या पार्श्वभूमीवर आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की, असं काहीही घडणार नाही. मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाचे मुख्यालय मुंबईतच राहील. आम्ही मुंबईला गौरवसंपन्न शहर बनवण्यासाठी बांधील आहोत आणि या शहरात अनेक रोजगार उत्पन्न करण्यासाठी कटिबद्ध आहोत’, असं ट्विट अदानी उद्योग समूहाने केलं आहे.

काही दिवसांपूर्वीच अदानी समूहाने मुंबई विमानतळाचा कारभार हाती घेतला होता. गौतम अदानी यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली होती. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले होते. मुंबई विमानतळ व्यवस्थापनामध्ये अदानी समूहाचा ७४ टक्के हिस्सा असेल. जीव्हीके समूहाकडे असलेला ५०.५ टक्के हिस्सा या समूहाने यापूर्वीच संपूर्णपणे मिळवला असून, आणखी २३.५ टक्के हिस्सा हा एअरपोर्ट कंपनी साऊथ आफ्रिका आणि बिडवेस्ट समूह या अन्य अल्पसंख्य भागीदारांकडून खरेदी केला जाईल, असे या संबंधीच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.