Sun. Jun 20th, 2021

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची जीभ घसरली

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची ट्विटरवर जीभ घसरली आहे. ट्विटरवर एका नेटकऱ्याच्या एका साध्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट त्या तरुणाचा बाप काढला आहे. या प्रकरणामुळे त्या चांगल्याच ट्रोल झाल्या आहेत.

किशोरी पेडणेकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केली होती. ही मुलाखत मुंबईतील लसीकरणाच्या संदर्भातील होती, ज्यामध्ये महापौर किशोरी पेडणेकर यांनी ग्लोबल कंत्राटाला ९ कंपन्यांचा प्रतिसाद मिळाल्याचा उल्लेख केला होता.

पेडणेकर यांच्या या ट्विटवर एका नेटकऱ्याने त्यांना ‘कुठल्या कंपन्यांना लस पुरवठ्याचं कंत्राट दिलं आहे’, असा प्रश्न विचारला. यावर किशोरी पेडणेकर यांनी ‘तुझ्या बापाला’ अशा भाषेत उत्तर दिलं आहे. या बातमीवर व्यक्त होताना एका नेटकऱ्याने ‘कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिले’ असा साधा प्रश्न विचारला. पण तरीही या प्रश्नाने महापौर किशोरी पेडणेकर संतापल्या.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर देताना वापरलेल्या या शब्दांमुळे त्यांची चांगलीच फजिती झाली. अखेर त्यांनी आपलं हे ट्विट डीलिट केलं. मात्र, असे असले तरी त्यांच्या या ट्विटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

‘किशोरी पेडणेकर यांनी आपल्या पक्षसंस्कृतीचं दर्शन घडवलंय’

दरम्यान, भाजपने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘लशींचं कॉण्ट्रॅक्ट कुणाला दिलं, असा प्रश्न विचारणाऱ्या मुंबईकराला ‘तुझ्या बापाला’ असं उत्तर देणाऱ्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या पक्षसंस्कृतीचं दर्शन घडवलंय. ते ट्वीट महापौरांनी डीलीट केलं असलं तरी मुंबईच्या प्रथम नागरिकाची ती असभ्य अक्षरं कायमची कोरली गेलीच. #जनाबसेना’, असं ट्विट करत भाजपने किशोरी पेडणेकरांवर निशाणा साधला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *