Wed. Jun 16th, 2021

‘मुंबईबाबत मुख्यमंत्री आज स्वतंत्र परिपत्रक जारी करतील’

राज्य सरकारने जारी केलेल्या अनलॉकच्या ५ टप्प्यांच्या नियोजनानुसार राज्यातील जिल्हे, महानगर पालिकांची वर्गवारी ५ गटांमध्ये केली जाणार आहे. यामध्ये स्थानिक कोरोना पॉझिटिव्हिटी रेट आणि एकूण ऑक्सिजन खाटांची उपलब्धता या प्रमाणावरून एक ते पाच टप्प्यांमध्ये ही वर्गवारी करण्यात आली असून त्यानुसार तेथील नियम देखील बदलणार आहेत. मात्र, या सगळ्यामध्ये मुंबई नेमकी कोणत्या गटात आहे, याविषयी संभ्रम निर्माण झाला असून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं आहे.

सध्याच्या आकडेवारीनुसार मुंबई तिसऱ्या गटामध्ये असल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. मात्र, मुंबईबाबत आज मुख्यमंत्री स्वतंत्र परिपत्रक जारी करतील, असं त्या म्हणाल्या आहेत. राज्य सरकारने मध्यरात्री उशीरा अधिसूचना जारी केल्यानंतर नेमकी नियमावली आणि मुंबई कोणत्या गटात असेल, तिथे काय नियम लागू असतील, यासंदर्भात मुख्यमंत्री संध्याकाळपर्यंत घोषणा करतील, अशी माहिती यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

‘मुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ९५ टक्के आहे. कालच्या तपासणीमध्ये एकूण ९६३ नवे रुग्ण तर बरे झालेले रुग्ण १२०७ आहेत. कालपर्यंत रुग्णवाढीचा दर ०.१३ टक्के आहे. त्यामुळे पॉझिटिव्हिटीचा रेट ५.३१ वर आहे, तर ऑक्सिजन खाटा ३२ ते ३४ टक्क्यांपर्यंत भरलेल्या आहे. त्यामुळे आपण तिसऱ्या गटामध्ये आहोत’, असं पेडणेकर म्हणाल्या.

“राज्य सरकारने प्रत्येक गटासाठी निकष दिले आहेत. त्यानुसार आपण आत्ताच्या घडीला तिसऱ्या गटात आहोत. यानुसार जी नियमावली मुख्यमंत्र्यांकडून सांगितली जाईल, ती आपल्याला पाळावी लागेल’, असंदेखील त्या म्हणाल्या.

तसेच लोकल प्रवासाविषयी केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून निर्णय घेतील. त्या निर्णयानुसार आपण कार्यवाही करणार आहोत, असं किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *