Jaimaharashtra news

जनता कर्फ्यू उठताच मुंबईत ट्राफिक जॅम!

कोरोना व्हायरस चा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्रात 144 कलम लागू केलं तरीही रविवारच्या जनता कर्फ्यू नंतर सोमवारी मुंबईच्या दिशेने असंख्य वाहनं निघाली होती. त्यामुळे मुंबईच्या मुलुंड टोल नाक्यावर वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे ही गर्दी टाळण्यासाठी अखेर ठाणे भिवंडी बायपास रस्त्यावर माणकोली नाका या ठिकाणी स्थानिक नारपोली पोलिसांकडून रस्ता अडवून धरत वाहनांना परत माघारी पाठवलं जात होतं.  

भिवंडी- ठाणे बायपास रस्ता हा मुंबई नाशिक महामार्गा वरून मुंबईच्या दिशेने जाणारा मुख्य रस्ता असून या रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढू लागली, तशी स्थानिक नारपोली पोलिसांनी या रस्त्यावर वाहन आडवी लावून या रस्त्यावरील मुंबई च्या दिशेने जाणारी वाहतूक अडवून धरली होती.

या वाहनांमधील अत्यावश्यक पेट्रोल, डिझेल, दूध, भाजीपाला, वाहतूक करणाऱ्या ट्रक व अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, अधिकारी यांच्या वाहनांना सोडलं जात होतं. असंख्य वाहन चालक आपण मुंबई येथील घरी जात असून येथे कोठे थांबून राहणार म्हणून हुज्जत घालत होते.

इंदूर येथील राधेश्याम जाट हे आपल्या ऐरोली येथील आपल्या कंपनी मध्ये काम करणाऱ्या मुलीला घरी घेऊन जाण्यासाठी कारने आले होते. परंतु माणकोली नाका येथे अडवल्याने ते चिंताक्रांत होते. ‘आपल्याला मुंबईत थांबायचं नसून फक्त मुलीला घेऊन माघारी इंदूरला जायचं आहे’ अशी विनंती त्यांनी पोलिसांना केली. मात्र पोलिसांकडून योग्य ते सहकार्य मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली. यापेक्षा जर आपल्याला इंदूर किंवा महाराष्ट्र सीमेवर अडवलं असतं तर आपण येथ पर्यंत पोहोचलोच नसतो, असं त्यांचं म्हणणं आहे.

Exit mobile version