मुंबईत पावसाचा जोर ओसरला

मुंबई: राज्यात पावसाचा जोर वाढला असून कोकणमधील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून मुसळधार कोसळत आहे. मुंबईत रात्रभर जोरदार पाऊस सुरु होता. मात्र आता मुंबईतील पावसाचा जोर ओसरला असून सखल भागात पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे.
पावसाचा जोर कायम राहिल्याने तर पुन्हा पाणी साचून वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पुढील ४८ तास जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कुर्ला, दादर परिसरात जोरदार पाऊस आहे. सायन येथील गांधीमार्केट जलमय झाले आहे. तसेच शीवमध्ये पाणी साचले आहे.
रेल्वे रुळावर पाणी आल्याने गाड्या बंद असून दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. दादर, शीव, माटुंगा परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून गेल्या अनेक तासांपासून हा पाऊस पडतोय. तर अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव परिसरात देखील धुवाधार पाऊस बरसत आहे. दादर, हिंदमाता, सायन किंग्ज सर्कल येथे सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं. मात्र आता पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे.