Friday, March 13, 2026 01:56:06 PM

Thane-Belapur Elevated Road: ठाणे ते नवी मुंबई विमानतळ प्रवास आता सुस्साट; 'डबल डेकर' उन्नत मार्गामुळे वाचणार वेळ

ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांदरम्यान प्रस्तावित असलेल्या 25 किलोमीटर लांबीच्या उन्नत (Elevated) मार्गामुळे सध्या लागणारा 90 मिनिटांचा वेळ केवळ 30 मिनिटांवर येणार आहे.

thane-belapur elevated road ठाणे ते नवी मुंबई विमानतळ प्रवास आता सुस्साट डबल डेकर उन्नत मार्गामुळे वाचणार वेळ

Thane-Belapur Elevated Road: ठाणे आणि नवी मुंबई दरम्यानचा प्रवास आता अधिक वेगवान आणि सुखकर होणार आहे. ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांदरम्यान प्रस्तावित असलेल्या 25 किलोमीटर लांबीच्या उन्नत (Elevated) मार्गामुळे सध्या लागणारा 90 मिनिटांचा वेळ केवळ 30 मिनिटांवर येणार आहे. हा प्रकल्प दोन्ही शहरांमधील दळणवळण सुलभ करण्याच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणार आहे.

प्रकल्पाचे स्वरूप आणि मार्ग रचना
वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी या मार्गाची आखणी विशेष पद्धतीने करण्यात आली आहे. या मार्गाचा प्रारंभ ठाण्यातील दिघा (पटनी मैदान) येथून होईल. वाशीतील पाम बीच रोडपर्यंतचा सुमारे 17 किलोमीटरचा टप्पा ठाणे-बेलापूर महामार्गाला समांतर असेल, तर त्यापुढील विमानतळापर्यंतचा 9 किलोमीटरचा मार्ग 'डबल डेकर' (दोन मजली) स्वरूपाचा असेल. या मार्गावर ताशी 100 किलोमीटर वेगाने वाहने धावू शकतील. तसेच, यावरील 6 इंटरचेंजेसमुळे ठाण्यासह कल्याण, डोंबिवली आणि मीरा-भाईंदरमधील प्रवाशांना थेट विमानतळ गाठणे सोपे होईल.

गुंतवणूक आणि अंमलबजावणी
सप्टेंबर 2025 मध्ये राज्य मंत्रिमंडळाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला असून, याची मुख्य जबाबदारी सिडकोवर सोपवण्यात आली आहे. नवी मुंबई विमानतळावरून डिसेंबर 2025 पासून विमानसेवा सुरू झाली आहे. भविष्यात वाढणारी प्रवाशांची संख्या लक्षात घेता हा उन्नत मार्ग अत्यंत कळीचा ठरणार असून, यामुळे कळवा नाका आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरील गर्दीतून प्रवाशांची कायमची सुटका होणार आहे.

हेही वाचा - Bellasis Bridge Reopens: ताडदेव-मुंबई सेंट्रलला जोडणारा पूल वाहतुकीसाठी सज्ज; मुख्यमंत्र्यांनी दिले 'हे' ऐतिहासिक नाव

मेट्रो मार्ग 8: दोन विमानतळांना जोडणारा दुवा
रस्ते मार्गासोबतच रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठीही हालचाली सुरू झाल्या आहेत. बेलापूर-मानखुर्द मेट्रो मार्ग (मेट्रो 8) द्वारे नवी मुंबई आणि मुंबई विमानतळ एकमेकांना जोडले जातील. हा मार्ग मानखुर्दहून वाशी खाडी पार करून सायन-पनवेल महामार्गावरून विमानतळापर्यंत जाईल. या प्रकल्पासाठी जमीन संपादनाचे आदेश देण्यात आले असून, जून 2026 पासून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.


सम्बन्धित सामग्री