मुंबई : द हेरिटेज प्रोजेक्ट ही ना-नफा तत्वावर चालणारी संस्था आणि मुंबई पोर्ट सस्टेनेबिलिटी फाऊंडेशन यांच्या सहकार्याने मुंबई बंदर प्राधिकरण मुंबई बंदराच्या मोफत मार्गदर्शित टूरद्वारे जनतेला भारताचा सागरी वारसा जाणून घेण्याची अनोखी संधी उपलब्ध करून देत आहे. मुंबई बंदराने सात दिवसांसाठी हा फेरफटका खुला केला आहे. सामान्य जनतेला मुंबई बंदर प्राधिकरण क्षेत्रांमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि बंदराच्या अंतर्गत कामकाजाची प्रथमच माहिती जाणून घेण्यासाठी आमंत्रित केले आहे. 14 ते 20 डिसेंबर 2024 या कालावधीत नियोजित हा आठवडाभर चालणारा कार्यक्रम असून याद्वारे भारतातील सर्वात जुन्या आणि प्रमुख बंदरांपैकी एकाचा इतिहास, परिचालन आणि महत्त्व याची एक दुर्मिळ झलक पाहता येईल.
ग्रीन गेट, बॅलार्ड पिअर, मुंबई बंदर प्राधिकरण या ठिकाणी सामान्य जनतेला मुंबई बंदराचा फेरफटका मारता येणार आहे. मुंबई बंदर प्राधिकरण क्षेत्रातील प्रवास हा नि:शुल्क असणार आहे. एका गटात (प्रति गट) 90 जणांना सहभागी होता येणार आहे. तसेच प्रति गटाला 3 तास मुंबई बंदराची सफर करता येणार आहे. 14 ते 15 डिसेंबर दरम्यान तीन गट सकाळी 8 ते 11, सकाळी 11.30 ते 2.30 आणि दुपारी 3 ते 6 यावेळेत लोकांना प्रवेश करता येणार आहे. 16 ते 20 डिसेंबर दरम्यान दोन गट सकाळी 8 ते 11 आणि दुपारी 3 ते 6 यावेळेत प्रवेश करू शकतात.
या उपक्रमाचा उद्देश बंदर आणि समुदायामधील अंतर कमी करणे, सहभागींना प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये प्रवेश करण्याची आणि बंदराचे ऐतिहासिक आणि परिचालन महत्त्व जाणून घेण्याची संधी उपलब्ध करून देणे हा आहे. मार्गदर्शित टूर्स इतिहास, संस्कृती आणि आधुनिक बंदर कामकाज यांची सांगड घालत एक समृद्ध अनुभव देणार आहेत. सहभागी महत्त्वाच्या खुणा शोधतील, मुंबईच्या सागरी परिवर्तनाच्या मनमोहक कथा जाणून घेतील आणि बंदर कामकाजाचे प्रत्यक्ष साक्षीदार होतील. या टूरची रचना सर्वसमावेशक असून वृद्ध, विशेष गरजा असलेल्या व्यक्ती आणि विद्यार्थ्यांसाठी अगदी सुलभ आहेत.
मुंबई बंदर प्राधिकरण हे एक महत्त्वपूर्ण व्यापार प्रवेशद्वार आहे आणि भारताच्या सागरी पायाभूत सुविधांचा एक कणा आहे. जो कार्यक्षम सागरी परिचालनाद्वारे जागतिक व्यापार आणि आर्थिक विकासाला चालना देतो.