मुंबईतील मुलुंड पश्चिम भागात मेट्रोच्या बांधकामादरम्यान एका पिलरमधील सिमेंटचा एक अवाढव्य भाग थेट खाली जाणाऱ्या रिक्षावर कोसळल्याने मोठा अनर्थ घडला. या थरारक अपघाताने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. या दुर्घटनेत चार जण गंभीर जखमी झाले असून, एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा आघात इतका भीषण होता की रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला. याप्रकरणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) कार्यकारी अभियंत्याला निलंबित केले असून कंत्राटदार आणि सल्लागार कंपनीच्या पाच अधिकाऱ्यांना अटक केली आहे. तसेच मुलुंड मेट्रो दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. त्याचसोबत मुलुंड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली आहे.
हेही वाचा- Mumbai Metro 4 Accident : कंत्राटदाराला 5 कोटी, तर सामान्य सल्लागारांना 1 कोटी रुपयांचा दंड; मेट्रो स्लॅब दुर्घटनेप्रकरणी MMRDA ची कारवाई
नेमकं प्रकरण काय?
शनिवार, 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास मुंबईतील मुलुंड पश्चिम येथील, लाल बहादूर शास्त्री रोडवरील जॉनसन अँड जॉनसन कंपनीजवळ मेट्रो 4 (ग्रीन लाईन) प्रकल्पांतर्गत एलबीएस स्थानकाचे बांधकाम सुरू असताना, उंचावरून सिमेंटच्या खांबाचा एक मोठा तुकडा अनपेक्षितपणे कोसळला. दुर्दैवाने, त्याच वेळी खालून जात असलेली एक रिक्षा या ढिगाऱ्याखाली आली. घटनेची भीषणता पाहून परिसरातील नागरिक तात्काळ मदतीला धावले. रिक्षा सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे त्यातील एक प्रवासी आतच अडकून पडला होता.
अग्निशमन दलाच्या जवानांनी, पोलीस आणि मेट्रो कर्मचाऱ्यांच्या मदतीने अवजड स्लॅब बाजूला सारून जखमींना तातडीने बाहेर काढण्यात आले आणि 108 रुग्णवाहिकेमार्फत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात मुंबई मेट्रोच्या 32.32 किलोमीटर लांबीच्या वडाळा-घाटकोपर-मुलुंड-कासारवडवली या मार्गिकेवर झाला आहे. हा एलिवेटेड कॉरिडोअर मुंबईकरांच्या प्रवासाचा वेळ 60 ते 75 मिनिटांवरून थेट 30 ते 40 मिनिटांवर आणण्यासाठी आखला गेला आहे. मुंबई लोकलवरील ताण कमी करण्याचे स्वप्न दाखवणारा हा प्रकल्प सध्या प्रगतीपथावर आहे, मात्र अशा अपघातांमुळे 'विकासाच्या वेगात' प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.