Abu Azmi Controversy: औरंगजेबावर केलेल्या वक्तव्याबद्दल दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी मरीन ड्राइव्ह पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. येथे पोहोचल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, 'मी छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचा आदर करतो. जर काहीही न करता गुन्हा दाखल झाला तर घाबरावे लागेलचं.' औरंगजेबावरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अबू आझमी यांना चौकशीसाठी अधिकाऱ्यासमोर हजर राहण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयाने दिले होते. न्यायालयाने त्यांच्या हजर राहण्याची तारीख 12, 13 आणि 15 मार्च रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत निश्चित केली आहे.
छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचा आदर करतो - अबू आझमी
दरम्यान, जेव्हा अबू आझमी सही करण्यासाठी मरीन ड्राइव्ह पोलिस स्टेशनला पोहोचले तेव्हा त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, 'जर काहीही न करता त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला तर घाबरावे लागेल. मी छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचा आदर करतो. या प्रकरणात मी अटकपूर्व जामीन घेतला आहे. मला पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तीन दिवसांसाठी सही करावी लागेल. यामध्ये कोणताही खटला दाखल करायचा नव्हता, पण आता काहीही न करता खटला दाखल केला जात आहे तेव्हा मला नक्कीच भीती वाटते. लोक मला दहशतवादी म्हणत आहेत.'
हेही वाचा - Devendra Fadnavis : औरंगजेबाची कबर पाडणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले,''आम्हालाही..''
महापुरुषांचा अपमान करणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे -
यावेळी अबू आझमी पुढे बोलताना म्हणाले की, विधानसभा व्यवस्थित चालावी अशी माझीही इच्छा आहे. सध्याची परिस्थिती पाहता, मला सरकारची भीती वाटते आणि मला छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांबद्दल खूप आदर आहे. जर कोणी महापुरुषांचा अपमान केला तर त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला शिक्षा झाली पाहिजे.
हेही वाचा - Abu Azmi Aurangzeb Controversy: अबू आझमी यांना अटक होणार का? देवेंद्र फडणवीस यांचा सपा आमदाराविरोधात आक्रमक पवित्रा
तत्पूर्वी, मरीन ड्राइव्ह पोलिस स्टेशनला पोहोचण्यापूर्वी, अबू आझमी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'मी मरीन ड्राइव्ह पोलिस स्टेशनला जात आहे. मला जामीन मिळाला आहे. न्यायालयाने मला पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तीन दिवसांसाठी पोलिसांसमोर सही करण्यास सांगितले आहे. न्यायालयाने स्वतः पोलिसांना विचारले की त्यांनी त्यांचे निवेदन वाचले आहे का? न्यायालयाने पोलिसांना तुम्ही एफआयआर कसा दाखल केला? असा सवाल केल्याचही अबू आझमी यांनी यावेळी नमूद केलं.
मंगळवारी, मुंबई सत्र न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभेत औरंगजेबाबद्दल केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अबू आझमी यांना 20 हजार रुपयांच्या सॉलव्हेंट बेल बॉन्डवर अटकपूर्व जामीन मंजूर केला. अटक टाळण्यासाठी अबू आझमी यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. याव्यतिरिक्त, त्यांना पुराव्यांशी छेडछाड करू नये, असे देखील सांगण्यात आले होते.