मुंबई: महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. योजनेअंतर्गत लाभार्थींना पूर्वी दरमहा 1,500 रुपये आर्थिक मदत मिळत होती. मात्र, सरकारकडून करण्यात आलेल्या छाननीनंतर आता 8 लाख महिलांना केवळ 500 रुपयेच मदत मिळणार आहे. हा निर्णय एप्रिल महिन्यापासून लागू करण्यात आला असून, अनेक महिलांना याचा परिणाम भोगावा लागणार आहे.
ही कपात होण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या वाढलेली आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून 6,000 रुपये आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेतून देखील 6,000 रुपये, अशा एकूण 12,000 रुपयांचा वार्षिक लाभ काही महिलांना मिळतो. त्यामुळे अशा महिलांना दुहेरी लाभ टाळण्यासाठी 'लाडकी बहीण' योजनेतून मिळणाऱ्या रकमेची कपात करून ती फक्त 500 रुपये करण्यात आली आहे.
सरकारच्या नियमानुसार, एकाच व्यक्तीला वैयक्तिक लाभाच्या केवळ एका योजनेचा फायदा घेता येतो. पण मागील काही काळात असे दिसून आले की अनेक महिला एकाचवेळी शेतकरी सन्मान निधी आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या. याच पार्श्वभूमीवर सरकारने छाननी केली असून, ज्या महिला दोन्ही योजना घेतात त्यांना ‘लाडकी बहीण’ योजनेतून केवळ 500 रुपयेच मिळतील, असा निर्णय घेतला आहे.
या नव्या निर्णयामुळे सुमारे 8 लाख लाभार्थी महिलांवर परिणाम होणार आहे. सरकारने स्पष्ट केलं आहे की, आर्थिक लाभाचा दुहेरी फायदा मिळू नये, यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे यापुढे संबंधित महिलांना केवळ एकाच योजनेचा मुख्य लाभ घेता येणार असून, दुसऱ्या योजनेतील सहाय्य मर्यादित स्वरूपात मिळेल.