Monday, February 09, 2026 01:59:39 PM

Manoj Tiwari : भाजप खासदार मनोज तिवारींच्या घरात चोरी; 2 वर्षांपूर्वी कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्यानेच 'असा' मारला डल्ला

तिवारी यांचे मॅनेजर प्रमोद पांडे यांनी अंबोली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा वेध घेतला आणि अवघ्या काही तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या.

manoj tiwari  भाजप खासदार मनोज तिवारींच्या घरात चोरी 2 वर्षांपूर्वी कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्यानेच असा मारला डल्ला

Heist at the house of BJP MP Manoj Tiwari : भोजपुरी सुपरस्टार आणि भाजप खासदार मनोज तिवारी यांच्या मुंबईतील राहत्या घरात चोरी झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. अंधेरी पश्चिम येथील शास्त्रीनगरमधील 'सुंदरबन' अपार्टमेंटमध्ये हा प्रकार घडला असून, तिवारी यांच्या कपाटातून तब्बल 5.40 लाख रुपयांची रोकड लंपास करण्यात आली होती. धक्कादायक म्हणजे, हा गुन्हा त्यांच्याच एका माजी कर्मचाऱ्याने केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तिवारी यांचे मॅनेजर प्रमोद पांडे यांनी अंबोली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा वेध घेतला आणि अवघ्या काही तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या.

ड्युप्लिकेट चाव्यांचा वापर आणि सीसीटीव्हीचा सापळा
या चोरीचा छडा लावण्यात तांत्रिक पुराव्यांनी मोलाची भूमिका बजावली. मनोज तिवारी यांनी दोन वर्षांपूर्वी सुरेंद्र कुमार दीनानाथ शर्मा या कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकले होते. मात्र, आरोपीने घराच्या मुख्य दरवाजासह बेडरुम आणि कपाटाच्या ड्युप्लिकेट चाव्या तयार करून घेतल्या होत्या. 15 जानेवारी 2026 रोजी रात्री 9:00 च्या सुमारास त्याने या चाव्यांच्या सहाय्याने घरात प्रवेश केला. गेल्या महिन्यातच घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते, ज्यात आरोपीची चोरी करतानाची हालचाल कैद झाली आणि त्याचा 'घरभेदी' चेहरा समोर आला.

हेही वाचा - Mohan Bhagwat : 'दहा-बारा वर्षांत जातिभेद संपुष्टात येईल', सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा मोठा दावा

दोन टप्प्यात केली चोरी; आरोपीने दिली कबुली
अंबोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीची ही घटना एकाच वेळी घडलेली नाही. आरोपी सुरेंद्र शर्मा याने जून 2025 मध्ये कपाटातून 4.40 लाख रुपये चोरले होते, ज्याचा तपास त्यावेळी लागला नव्हता. त्यानंतर त्याने पुन्हा धाडस करत 15 जानेवारीच्या रात्री सुमारे 1 लाख रुपये लंपास केले. सीसीटीव्ही फुटेज मॅनेजर पांडे यांना दाखवले असता, त्यांनी सुरेंद्रला ओळखले. पोलिसांनी तातडीने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले, जिथे त्याने ड्युप्लिकेट चाव्यांच्या सहाय्याने चोरी केल्याची कबुली दिली.

राजकीय प्रवास आणि लोकप्रिय कलावंत
मनोज तिवारी हे केवळ राजकारणी नसून भोजपुरी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज नाव आहेत. 2009 मध्ये समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती. मात्र, 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते दिल्लीतून खासदार म्हणून निवडून आले. गायकी आणि अभिनयाच्या जोरावर आजही त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. अशा लोकप्रिय व्यक्तीच्या घरात झालेली चोरी आणि त्यातही एका विश्वासातील जुन्या कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याने मुंबईत मोठी चर्चा रंगली आहे.

हेही वाचा - Atal Setu Toll-Free: मुंबईकर आता सुस्साट! अटल सेतूवरून करा मोफत प्रवास, मात्र 'या' गाड्यांना भरावा लागणार...


सम्बन्धित सामग्री