Sunday, November 16, 2025 05:17:34 PM

LPG Safety Drive In Mumbai : मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये एलपीजी सुरक्षा मोहीम सुरू; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाचा उपक्रम

मुंबई अग्निशमन दलाने (एमएफबी) मोठ्या प्रमाणात एलपीजी सुरक्षा जागरूकता मोहीम सुरू केली आहे.

lpg safety drive in mumbai  मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये एलपीजी सुरक्षा मोहीम सुरू दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाचा उपक्रम

मुंबई : कांदिवली येथे शिवानी केटरिंग सर्व्हिसेसमध्ये एलपीजी गॅस गळतीमुळे झालेल्या आगीच्या दुर्दैवी घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्यानंतर मुंबई अग्निशमन दलाने (एमएफबी) मोठ्या प्रमाणात एलपीजी सुरक्षा जागरूकता मोहीम सुरू केली आहे. दिवाळीत आगीशी संबंधीत घटनांच्या संख्येत वाढ होत असल्याने शहरातील झोपडपट्टी आणि चाळींना लक्ष्य करून हा उपक्रम दिवाळीच्या सुरुवातीला करण्यात आला आहे.

मुख्य अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकर यांनी जाहीर केले की, शहरातील 37 अग्निशमन केंद्रे 200 उच्च-जोखीम असलेल्या ठिकाणी मोहिमेत सहभागी होतील. प्रत्येक अग्निशमन केंद्र उत्सवाच्या काळात 10 वेगवेगळ्या ठिकाणी दररोज सत्रे आयोजित करेल. या सत्रांचा उद्देश रहिवाशांना एलपीजी सुरक्षितता, गॅस गळती कशी ओळखावी. तसेच आग लागल्यास काय करावे, याबद्दल शिक्षित करणे आहे. "दिवाळीच्या काळात आगीच्या घटनांची संख्या वाढते. यापैकी अनेक घटना एलपीजी सिलिंडरच्या अयोग्य वापराशी किंवा हाताळणीशी संबंधीत असतात," असे अंबुलगेकर म्हणाले.

हेही वाचा : Cyclonic Circulation In Mumbai : चक्रीवादळजन्य परिस्थितीमुळे मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता; उष्णतेपासून दिलासा मिळणार?

एका वरिष्ठ अग्निशमन अधिकाऱ्याने याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, जेव्हा सिलिंडर वितरित केले जातात, तेव्हा रहिवासी अनेकदा महत्त्वाच्या सुरक्षा तपासणीकडे दुर्लक्ष करतात. “कधीकधी, क्वार्टर पिन चुकीच्या पद्धतीने जुळलेला असतो. ज्यामुळे गॅस गळती होते. आम्ही लोकांना अशा समस्या ओळखून त्या कशा दुरुस्त करायच्या हे शिकवतो,” असे ते पुढे म्हणाले.

या कार्यक्रमात संभाव्य गॅस गळती कशी हाताळायची, एलपीजी वापरताना घ्यायच्या खबरदारी आणि आग लागल्यास आपत्कालीन उपाययोजना याबद्दल दोन तासांचे प्रशिक्षण सत्र समाविष्ट आहे. या सत्रांमध्ये नागरिक आणि डिलिव्हरी एजंट दोघेही उपस्थित राहतील. अग्निशमन दल कुटुंबांना घरी गॅस वापरताना सुरक्षित पद्धतींबद्दल अधिक जागरूक होण्यास प्रोत्साहित करत आहे.

सुरक्षा वाढविण्यासाठी, एमएफबीने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ज्यात लोकांना नियमितपणे गळती तपासण्याची, एक्झॉस्ट फॅन वापरण्याची, रेग्युलेटर आणि स्टोव्ह नॉब बंद करण्याची, अग्निशामक यंत्रे किंवा वाळूच्या बादल्या जवळ ठेवण्यास, परिसर हवेशीर ठेवण्यास, इतर अनेक गोष्टी करण्यास सांगितले आहे.


सम्बन्धित सामग्री