मुंबई : मुंबईच्या राम मंदिर रेल्वे स्थानकावर एका महिला प्रवाशाने बाळाला जन्म दिला. डॉक्टर किंवा रुग्णवाहिकेची सुविधा नसल्याने, एका तरुणाने त्याच्या महिला डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करत महिलेला रेल्वे प्लॅटफॉर्मवर बाळाला जन्म देण्यास मदत केली. मिळालेल्या माहितीनुसार, गर्भवती प्रवाशाला मदत करणारा विकास दिलीप बेद्रे काल रात्री १२.४० वाजता गोरेगाव रेल्वे स्थानकावरून विमानतळाकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढला. राम मंदिर रेल्वे स्थानकाजवळ गर्भवती महिला अचानक आजारी पडली. विकासने लोकल ट्रेनची चेन ओढली आणि राम मंदिर स्थानकावर ट्रेन थांबवली.
हेही वाचा : Supreme Court : मृत्युदंडासाठी पर्यायी पद्धतींचा विचार करा; सुनावनीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र सरकारला सूचना
राम मंदिर रेल्वे स्थानकावर महिलेसाठी कोणतीही वैद्यकीय सुविधा किंवा रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने विकासने त्याच्या महिला डॉक्टर मैत्रिणीला फोन करून अपडेट दिले. डॉक्टरांनी व्हिडिओ कॉलद्वारे महिलेला प्रसूती प्रक्रिया समजावून सांगितली. परिणामी, राम मंदिर रेल्वे स्थानकावर बाळाला सुरक्षितपणे जन्म दिला. आई आणि बाळ दोघेही सध्या बरे आहेत. गर्भवती महिलेला मदत करणाऱ्या तरुणाचे नाव विकास दिलीप बेद्रे असून त्याच्या महिला डॉक्टरचे नाव डॉ. देविका देशमुख असे आहे. सध्या दोघांचेही त्यांच्या कामासाठी कौतुक होत आहे.