मुंबई - कुलाबा ते आरे मेट्रो ३ मार्गिकेमुळे बाधित होणाऱ्या काळबादेवी आणि गिरगाव भागातील प्रकल्पाबाधितांना हक्काच्या घरासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. एमएमआरसीकडून प्रकल्पबाधितांसाठी उभारण्यात येत असलेल्या तीन इमारतींपैकी दोन इमारतींचीच कामे आतापर्यंत सुरू होऊ शकली आहेत. तर एका इमारतीचे काम अद्याप निविदा प्रक्रियेतच अडकले आहे. त्यामुळे या इमारतींमधील हक्काच्या घराचा ताबा २०२५ नंतरच टप्प्याटप्प्याने रहिवाशांना मिळणार आहे. मेट्रो ३ मुळे काळबादेवी आणि गिरगाव भागातील निवासी आणि व्यावसायिक मिळून ५७६ गाळे बाधित झाले होते. एमएमआरसीकडून या प्रकल्पबाधितांचे तीन वेगवेगळ्या इमारतींमध्ये पुनर्वसन केले जाणार आहे.