Second Bullet Train in Maharashtra : महाराष्ट्राच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये लवकरच एक नवी क्रांती पाहायला मिळणार आहे. सध्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम जोरात सुरू असतानाच, आता राज्यातून आणखी एक बुलेट ट्रेन धावणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे हा प्रवास अवघ्या काही मिनिटांचा खेळ ठरणार असून पुणेकरांसाठी हैदराबादचे अंतरही कमालीचे कमी होईल. सध्या मुंबई ते पुणे हा साधारण 170 ते 190 किमीचा प्रवास करण्यासाठी रस्ते किंवा रेल्वेमार्गाने 3 ते 4 तास लागतात. मात्र, नवीन हायस्पीड रेल्वेमुळे हे अंतर केवळ 48 मिनिटांत पार करता येईल.
मुंबई-पुणे प्रवास आता निम्म्याहून कमी वेळेत!
केंद्र सरकारने राज्याला दुसऱ्या बुलेट ट्रेनची मोठी भेट दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2026 मध्ये 'मुंबई-पुणे-हैदराबाद' हायस्पीड रेल कॉरिडॉरची अधिकृत घोषणा केली आहे. या कॉरिडॉरमुळे मुंबई आणि पुणे ही दोन आर्थिक केंद्रे प्रत्यक्षात एकाच शहरासारखी जोडली जातील. याचा मोठा फायदा आयटी प्रोफेशनल, विद्यार्थी आणि दररोज प्रवास करणाऱ्या नोकरदारांना होणार आहे. या मार्गावर ताशी 220 ते 350 किमी वेगाने बुलेट ट्रेन धावेल, ज्यामुळे वेळेची मोठी बचत होईल.
पुणे ते हैदराबाद: 1 तास 55 मिनिटांचा वेगवान प्रवास
हा केवळ मुंबई-पुणे मर्यादित प्रकल्प नसून तो हैदराबादपर्यंत विस्तारलेला 767 किमीचा महामार्ग आहे. पुणे ते हैदराबाद हे 550 किमीचे अंतर पार करण्यासाठी सध्या 10 ते 12 तास लागतात, पण बुलेट ट्रेनमुळे हे अंतर अवघ्या 1 तास 55 मिनिटांत कापले जाईल. या संपूर्ण मार्गावर एकूण 11 थांबे प्रस्तावित आहेत. यामुळे महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांमधील व्यापार, पर्यटन आणि औद्योगिक संबंधांना नवी गती मिळेल.
हेही वाचा - Mumbai Pune Expressway Traffic Jam : भीषण अपघातानंतर गॅस गळतीमुळे महामार्ग ठप्प; रुग्ण आणि प्रवाशांचे अतोनात हाल, विमानेही चुकली!
रेल्वेसाठी 2.77 लाख कोटींची विक्रमी तरतूद
अर्थसंकल्प 2026-27 मध्ये रेल्वे क्षेत्रासाठी केंद्राने 2.77 लाख कोटी रुपयांची ऐतिहासिक तरतूद केली आहे. देशभरात एकूण 7 नवीन हायस्पीड कॉरिडॉर विकसित केले जाणार असून, त्यात मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद या महाराष्ट्रातील मार्गांचा प्राधान्याने समावेश आहे. या गुंतवणुकीमुळे केवळ बुलेट ट्रेनच नाही, तर राज्यातील 132 रेल्वे स्थानकांचा 'अमृत भारत' योजनेअंतर्गत कायापालट केला जाणार आहे. आर्थिक वर्ष 2026-27 साठी रेल्वे मंत्रालयाला 2,77,830 कोटी रुपये भांडवली खर्चासाठी मंजूर करण्यात आले आहेत. यापैकी महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी 23,926 कोटी रुपयांचा बूस्ट देण्यात आला आहे. (यामध्ये मोठा खर्च कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर होत असून 2024–25 मधील 58,844 कोटी रुपयांचा पेन्शन खर्च 2026–27 मध्ये सुमारे 74,500 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.)
आर्थिक आणि औद्योगिक क्रांतीचे नवे केंद्र
मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेनमुळे उद्योग, आयटी आणि रोजगार क्षेत्राला मोठी उभारी मिळणार आहे. प्रवास पर्यावरणपूरक आणि हायस्पीड असल्याने कार्बन उत्सर्जनात घट होईल आणि मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवरील वाहतूक कोंडीचा ताणही कमी होईल. हे प्रकल्प 'विकसित भारत 2047' च्या स्वप्नपूर्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात सध्या सुमारे 1,70,000 कोटी रुपयांची रेल्वेची कामे प्रगतीपथावर असून, आगामी काळात पालघरप्रमाणेच राज्याच्या इतर भागातही 'ब्रेक-थ्रू' पाहायला मिळतील.
हेही वाचा - Palghar Bullet Train Project: बुलेट ट्रेनसाठी सज्ज! पालघरच्या शिरपेचात मानाचा तुरा; दुसऱ्या महाकाय बोगद्याचे काम फत्ते