Bandra Water Cut: उन्हाळ्याची चाहुल लागताच उन्हाच्या झळांसोबतच मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. वांद्रे (पश्चिम) परिसरातील एका मुख्य जलवाहिनीला लागलेली गळती रोखण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. यामुळे मंगळवारी, 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत वांद्रे पश्चिम विभागातील अनेक भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
नेमके कारण काय?
पाली हिल जलाशयाला पाणी पुरवठा करणाऱ्या 900 मि.मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला (Inlet) गळती लागली आहे. ही गळती रोखण्याचे काम वांद्रे येथील कुरेशी नगर झोपडपट्टी आणि पश्चिम द्रुतगती महामार्गालगत असलेल्या म्हाडाच्या मोकळ्या भूखंडात केले जाणार आहे.
'या' भागात बसणार पाणी कपातीचा फटका -
या दुरुस्तीमुळे वांद्रे पश्चिमेकडील हिल मार्ग, कार्टर रोड, पाली गाव, चिंबई, शेर्ली गाव, कांतवाडी, माऊंट मेरी, माउंट मेरी कॅथेड्रल परिसर, के.सी. मार्ग आणि एल.के. मेहता मार्ग यांसारख्या प्रमुख ठिकाणचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असेल. तसेच खार दांडा, कोळीवाडा, दांड पाडा, गझदरबंध, हनुमान नगर, लक्ष्मी नगर आणि खारमधील 15 व्या ते 20 व्या रस्त्यापर्यंतच्या परिसरातही पाणी येणार नाही. या व्यतिरिक्त ताज लँड्स एन्ड, बी.जे. मार्ग, एच.के. भाभा मार्ग आणि काणे मार्ग यांसारख्या काही भागात मध्यरात्रीनंतर 1 ते पहाटे 4:30 या वेळेत अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाईल.
हेही वाचा - Pune-Mumbai Trains: ट्रेन नाही, एसटीत गर्दी अन् हायवेवर ट्रॅफिक! पुणे-मुंबई प्रवाशांचे हाल; तिसऱ्या-चौथ्या रेल्वे मार्गिकेचं घोडं नेमकं अडलंय कुठं?
दरम्यान, महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी 10 फेब्रुवारीपूर्वीच पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा आणि मंगळवारी पाणी अत्यंत काटकसरीने वापरावे. दुरुस्तीच्या कामामुळे पुढील काही दिवस नळाला येणारे पाणी गढूळ असण्याची शक्यता असल्याने, आरोग्यविषयक खबरदारी म्हणून पाणी उकळून आणि गाळून पिण्याची सूचनाही देण्यात आली आहे. प्रशासनाच्या या दुरुस्ती कार्यामुळे वांद्रेवासियांना मंगळवारी मोठा पाणीबाणीचा सामना करावा लागणार आहे.