मुंबई : मागील अनेक दिवस मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावली आहे. दोन दिवसांपूर्वी संपूर्ण मुंबईतील हवेची ‘वाईट’ श्रेणीत नोंद झाली होती. तर काही भागात दररोज हवा ‘वाईट’श्रेणीत नोंदली जात आहे. राजधानी दिल्लीतील वायू प्रदुषणाबद्दल चिंता व्यक्त होत असतानाच दुसरीकडे मुंबईमधील प्रदूषणात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींनी मुंबईमधील वाढत्या हवा प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली आहे. सध्या समाजमाध्यमावर शहरातील काही प्रदूषित भागांची छायाचित्र टाकून ‘व्हॉट वी आर ब्रिदींग’ असा सवाल मुंबईकर करीत आहेत.
मुंबईत सर्वात वाईट हवा कुठे ?
मुंबईत वांद्रे – कुर्ला संकुल, भायखळा, शिवडी, कुलाबा, शिवाजीनगर - मानखुर्द या ठिकाणी वाईट हवा असल्याचे दिसून येते.
प्रदूषित हवेचे दुष्परिणाम काय ?
दिवसरात्र जागे शहर अशी ख्याती असलेल्या मुंबई शहरात सतत गाड्यांची ये- जा सुरू असते. यामुळे प्रदुषण होते. वाढत्या गाड्यांमुळे प्रदुषण वाढते आणि वाढलेल्या प्रदुषणाचा फटका नागरिकांना होत असतो. दिवसभरात गाड्यांनी सोडल्या धुरामुळे डोळे, नाक, घशात जळजळ सुरू होते. प्रदुषणामुळे सतत खोकला चालु राहतो. त्याचबरोबर श्वसननलिकेचे आजार देखील होतात.